धवल कुलकर्णी

१९९५ मध्ये शिवसेना-भाजप युतीची सत्ता महाराष्ट्रात आल्यावर पहिल्यांदाच मंत्रालयावर भगवा फडकला. त्यावेळेला शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी ”मी या सरकारचा रिमोट कंट्रोल असेन,” असे जाहीरपणे सांगितले होते. जवळजवळ २० वर्षानंतर महाराष्ट्रात शिवसेनेचा मुख्यमंत्री व ते सुद्धा स्वतः शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे झाल्यानंतर, रिमोट कंट्रोल मात्र ‘मातोश्री’ऐवजी ‘सिल्वर ओक’कडे असेल. कारण, शिवसेना, काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसच्या या खिचडी सरकारचे होकायंत्र राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या हातात असेल, असे दिसते.

सुरुवातीला शिवसेनेसोबत जाण्याबाबत काहीशा दोलायमान मनःस्थितीत असलेल्या काँग्रेस हायकमांडला राजी करण्याबाबत भूमिका बजावण्यापासून (उद्धव ठाकरेंच्या शपथविधीसाठी काँग्रेसच्या प्रभारी अध्यक्ष सोनिया गांधी, राहुल गांधी हे दोघेही आले नाहीत, ही बाब लक्षणीय) ते पुतणे अजित पवार यांचं बांड शमवण्यापर्यंत या आघाडीच्या स्थापनेमध्ये मोठी भूमिका पार पाडणारे शरद पवार व त्यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचाच वरचष्मा या सरकारवर असू शकतो.

इंग्रजांचे वर्णन हे “a race destined to govern and subdue” (एक वंश ज्याला नियतीने राज्य करण्याचा अधिकार दिला आहे) असे करण्यात यायचे. महाराष्ट्रात तसेच काहीसे काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसचेही झाले आहे. पिढ्यानपिढ्या सत्तेचा उपभोग घेतल्यामुळे काँग्रेस आणि त्यांच्यातूनच फुटून निघालेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांना चौखूर उधळणाऱ्या सत्तेच्या/ सरकारच्या वारुवर मांड कशी ठोकावी, हे खूप चांगलं माहिती आहे. त्यामानाने शिवसेना ही राज्याच्या या राजकारणात इतकी माहीर नाही. त्यांचे राजकारण हे मुंबई व ठाणे महापालिकेच्या भोवती केंद्रित झालेले. त्यामुळे सरकारमध्ये शिवसेनेच्या मंत्र्यांची संख्या काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसच्या मंत्र्यांपेक्षा अधिक असली तरीसुद्धा सरकारी यंत्रणांवर कोणाची पकड असू शकेल, हे काही वेगळं सांगायला नको.

लक्षणीय गोष्ट ही की, महाराष्ट्र हे राज्य तसे काँग्रेस विचाराच्या धाटणीचे. १९७८ मध्ये पहिले युती सरकार महाराष्ट्र स्थापन झाले तेसुद्धा काँग्रेसच्या गटांच्या सहयोगाने. १९९५ मध्ये आधी मनोहर जोशी व नंतर नारायण राणे मुख्यमंत्री झाले. त्यावेळी त्यांच्या सरकारला बाहेरून अपक्षांचा पाठिंबा होता. यातले बरेच अपक्ष हे मूळ काँग्रेसवाले होते, हे वेगळे सांगायला नको. २०१४ मध्ये देवेंद्र फडणवीस महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री झाले त्यावेळी त्यांना सुरुवातीला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने बाहेरून पाठिंबा दिला होता. त्यावेळी काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसच्या काही नेत्यांनी भाजपमध्ये प्रवेश करून मग नरेंद्र मोदी लाटेत महाराष्ट्रात विजय संपादन केला होता.

पण राष्ट्रवादी व शिवसेना या दोन्ही पक्षांचा अनुभव गाठीशी असलेल्या एका आमदाराने मात्र हे नाकारले. “हे सर्व घडून आल्यामध्ये पवार साहेबांचा मोठा वाटा होता हे निश्चित. त्यासाठी व त्यांचा अनुभव पाहता त्यांना आदर हा द्यावाच लागेल. पण घटनात्मक तरतुदीप्रमाणे मुख्यमंत्री म्हणून उद्धवजींचा कंट्रोल राहील. ठाकरे हे सहजासहजी कुणासमोर झुकणार नाहीत,” असे या आमदारांनी सांगितले.