देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांचे सरकार असत्याच्या पायावर उभे होते. त्यामुळे ते पत्त्याच्या बंगल्याप्रमाणे कोसळले. दोघांनी महाराष्ट्राच्या जनतेची माफी मागितली पाहिजे. फडणवीस यांनी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिल्यानंतर लगेच काँग्रेसकडून ही मागणी करण्यात आली.

“हा फक्त देवेंद्र फडणवीस यांचा पराभव नाही तर दिल्लीत बसलेल्या त्यांच्या नेत्यांच्या चेहऱ्यावर चपराक आहे” असे काँग्रेसने म्हटले आहे. लोकांनी दिलेल्या जनादेशाचे अपहरण करणारे आज उघडे पडले आहेत असे काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते रणदीप सूरजेवाला म्हणाले.

मुख्यमंत्र्यांनी दिला राजीनामा
अजित पवारांचा राजीनामा आल्याने आमच्याकडेही बहुमत उरलेलं नाही. राष्ट्रवादी काँग्रेसचा गट आमच्यासोबत आल्याने आम्ही सत्ता स्थापन केली होती. आता अजित पवारच आमच्यासोबत नाहीत त्यामुळे आमच्याकडे बहुमत नाही. आम्ही आमदार फोडणार नाही. ही पत्रकार परिषद झाल्यावर मी राज्यपालांना भेटून राजीनामा देणार आहे असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केलं. त्यानुसार त्यांनी राजभवन या ठिकाणी जाऊन राज्यपालांकडे राजीनामा सादर केला.

शिवसेनेने लाचारी पत्करली आहे म्हणूनच शिवसेनेने काल सोनिया गांधी यांच्या नावाची शपथ घेतली. यापेक्षा लाचारी काय? आम्ही विरोधात बसण्याचा निर्णय घेतला आहे असंही फडणवीस यांनी म्हटलं आहे. महाराष्ट्राच्या जनेतने महायुतीला संपूर्ण बहुमत दिलं होतं. महाराष्ट्रात भाजपाला संपूर्ण जनादेश देत १०५ जागा दिल्या. आम्ही शिवसेनेसोबत ही निवडणूक लढलो. भाजपाला जनादेश होता असं मी यासाठी म्हणतो आहे कारण ७० टक्के जागा आम्ही जिंकलो असंही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे.