राज्यातील मुस्लीम नेत्यांची सोनिया गांधींकडे तक्रार

नवी दिल्ली : विधानसभा निवडणुकीत जिंकण्याची मोठी संधी असलेल्या मुस्लिमबहुल जागा प्रदेश काँग्रेसचे नेते जाणीवपूर्वक समाजवादी पक्षाला आंदण देत असल्याची तक्रार राज्यातील काँग्रेसच्या काही मुस्लीम नेत्यांनी पक्षाध्यक्ष सोनिया गांधी तसेच राहुल गांधी यांच्याकडे केली आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस प्रत्येकी १२५ जागा लढवणार असून ३८ जागा मित्रपक्षांना दिल्या जाणार आहेत.

गेल्या विधानसभा निवडणुकीत समाजवादी पक्षाचे नेते अबू आझमी गोवंडी-शिवाजीनगर मतदारसंघातून निवडून आले. मात्र, नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत याच विधानसभा मतदारसंघात काँग्रेसला सुमारे १४ हजारांचे मताधिक्य मिळाले होते. भिवंडी मतदारसंघात ६२ हजारांचे, तर औरंगाबादमध्ये ८ हजारांचे मताधिक्य पक्षाला मिळाले होते. हे तीनही मतदारसंघ काँग्रेसने सपासाठी सोडून देण्याचे ठरवले असल्याचा दावा या नेत्यांनी केला आहे. शिवाय, भायखळा, अकोला आणि नंदूरबार या तीन मतदारसंघांत सप मैत्रीपूर्ण लढत देणार आहे. सहापैकी तीन मतदारसंघांत सप काँग्रेसच्या मदतीने निवडणूक लढवणार आणि उर्वरित तीन जागांवर काँग्रेसचा पराभव करून त्या भाजपच्या पदरात टाकणार असतील तर प्रदेश काँग्रेस नेते जिंकणाऱ्या जागा समाजवादी पक्षाला का देत आहेत, असा सवाल या नेत्यांनी केला आहे. जागावाटपात मुस्लीम तसेच ओबीसी उमेदवारांना डावलले जात असल्याचे आणि त्यातून होणाऱ्या संभाव्य नुकसानीची बाब प्रदेश काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांनाही स्पष्टपणे सांगण्यात आली आहे. तरीही या मुद्दय़ाकडे दुर्लक्ष केले जात असल्याचा आरोपही करण्यात आला आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसला जास्तीत जास्त शंभर जागा द्यायला हव्या होत्या. १२५ जागा देऊन काँग्रेसने स्वत:चे नुकसान करून घेतल्याचेही मुस्लीम नेत्यांचे म्हणणे आहे.

..तर मुस्लीम एमआयएमकडे जातील!

दक्षिण मुंबई, दक्षिण मध्य, उत्तर-पूर्व आणि उत्तर-पश्चिम या लोकसभा मतदारसंघातील प्रत्येक दोन विधानसभा मतदारसंघांमध्ये २५ ते ३५ टक्के मतदार मुस्लीम आहेत. महाराष्ट्रात ४२ टक्के विधानसभा मतदारसंघांमध्ये मुस्लीम आणि वंचित समाजाची मते प्रभावी ठरतात. त्यामुळे मुंबईसह अन्य मतदारसंघांत मुस्लीम उमेदवारांना अधिक प्राधान्य दिले पाहिजे. अन्यथा अजूनही काँग्रेसशी जोडलेले मुस्लीम मतदार असादुद्दीन ओवेसी यांच्या एमआयएमकडे कायमचे जाण्याचा धोका निर्माण झाला आहे. असे झाले तर काँग्रेसची उत्तर प्रदेशप्रमाणे महाराष्ट्रातही बिकट स्थिती होईल. मराठा मतदार राष्ट्रवादी काँग्रेस, भाजप आणि शिवसेनेत विभागला गेला असताना राज्यात काँग्रेस पक्ष बळकट करायचा असेल तर मुस्लीम, ओबीसी, दलित मतदारांची भक्कम फळी उभी करण्याची मागणी मुस्लीम नेत्यांनी केली आहे. मनोज संसारी, प्रकाश शेंडगे, लक्ष्मण माने हे दलित आणि ओबीसी नेत्यांना काँग्रेसने उमेदवारी दिली तर वंचित बहुजन आघाडीला मिळणारी मते काँग्रेसकडे वळू शकतील, असा दावाही करण्यात आला आहे.