25 November 2020

News Flash

महाराष्ट्रात भाजपाचा मुख्यमंत्री आणि शिवसेनेचा उपमुख्यमंत्री?

भाजपातील एका वरिष्ठ नेत्याने ही माहिती दिली आहे

विधानसभा निवडणुकीचे निकाल जाहीर झाले आहेत, मात्र मुख्यमंत्री कोण होणार या प्रश्नावर सगळं घोडं अडलं आहे. कारण शिवसेनेने सगळं काही समसमान या लोकसभेच्या वेळी ठरलेल्या फॉर्म्युल्यानुसार अडीच-अडीच वर्ष मुख्यमंत्रीपद अशी मागणी केली आहे. त्यामुळे आता हा फॉर्म्युला महाराष्ट्रात लागू होणार की नाही याची चर्चा सुरु असतानाच शिवसेनेला उपमुख्यमंत्रीपद दिलं जाण्याची शक्यता आहे, असं भाजपाच्या एका विश्वसनीय सूत्राकडून समजतं आहे. इंडियन एक्स्प्रेसने या संदर्भातले वृत्त दिले आहे. नेमकं काय घडणार हे सोमवारनंतर म्हणजेच आजचा दिवस गेल्यावरच ठरणार आहे. तूर्तास तरी भाजपाचा मुख्यमंत्री आणि शिवसेनेचा उपमुख्यमंत्री असं सूत्र ठरण्याची शक्यता आहे.

२४ ऑक्टोबरला जेव्हा विधानसभा निवडणूक निकाल लागले त्याचदिवशी उद्धव ठाकरेंनी 50:50 फॉर्म्युल्याची आठवण भाजपाला करुन दिली. इतकंच नाही तर शनिवारी मातोश्रीवर शिवसेनेच्या विजयी आमदारांची बैठक पार पडली. या बैठकीतही या ठरावावर शिक्कामोर्तब करण्यात आलं आणि भाजपाकडून तसं लेखी आश्वासन घेण्यात यावं अशीही मागणी शिवसेना आमदारांनी उद्धव ठाकरेंकडे केली. निवडणुकीपूर्वी भाजपाचाच मुख्यमंत्री होणार असं म्हणणारे भाजपाचे नेतेही आता महायुतीचा मुख्यमंत्री होणार हे म्हणत आहेत. त्यामुळे नेमका मुख्यमंत्री कोणत्या पक्षाचा होणार? भाजपाचा की शिवसेनेचा हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. अशातच आता भाजपाकडे मुख्यमंत्रीपद आणि शिवसेनेकडे उपमुख्यमंत्रीपद असं सत्तेचं सूत्र ठरल्याची माहिती भाजपातल्याच एका वरिष्ठ नेत्याने दिली आहे.

विधानसभा निवडणूक निकालात भाजपाला १०५ तर शिवसेनेला ५६ जागा मिळाल्या आहेत. शिवसेना सत्तेत सहभागी झाल्याशिवाय सरकार स्थापन होणार नाही यामुळेच शिवसेनेने अडीच अडीच वर्षे मुख्यमंत्रीपद वाटून घ्या अशी प्रमुख मागणी केली आहे. आता शिवसेनेसोबतच्या वाटाघाटी यशस्वी होणं महत्त्वाचं आहे. त्यामुळे येत्या काही दिवसात काय काय घडणार? सत्तास्थापनेची काय काय सूत्रं समोर येणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 28, 2019 7:41 am

Web Title: maharashtra shiv sena still in hunt for cms post bjp likely to offer deputy cm scj 81
Next Stories
1 नगरच्या राजकारणात विखे एकाकी, मंत्रिपदाला भाजपातूनच विरोध सुरु
2 पंकजा मुंडेंसाठी दोन आमदारांकडून राजीनाम्याची तयारी
3 रेल्वेच्या भुयारी पुलाखालील पाण्यात राष्ट्रवादीचे आंदोलन
Just Now!
X