मुख्यमंत्री फडणवीस यांच्या कानपिचक्या ; महाराष्ट्र स्वाभिमान पक्ष भाजपमध्ये विलीन

कणकवली/रत्नागिरी : आमदार नितेश राणे यांच्या कार्यपद्धतीमध्ये आक्रमकता आहे. पण प्रभावी राजकीय नेतृत्वासाठी संयमाचीही गरज असते. नितेश यांनी नुकताच भाजपमध्ये प्रवेश केला आहे. त्यामुळे येथील शाळेत आम्ही त्यांना तो शिकवू, अशा शब्दांत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कणकवली येथील प्रचार सभेत नितेश यांचे कौतुक करतानाच कानपिचक्याही दिल्या.

खासदार नारायण राणे यांनी स्थापन केलेला महाराष्ट्र स्वाभिमान पक्ष मंगळवारी कणकवली येथे आयोजित विधानसभा निवडणुकीच्या प्रचारसभेचे निमित्त साधत भाजपमध्ये विलीन करण्यात आला. आमदार नितेश यांनी यापूर्वीच भाजपचे सदस्यत्व स्वीकारले आहे. मंगळवारी त्यांचे ज्येष्ठ बंधू नीलेश यांच्यासह महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाच्या अनेक कार्यकर्त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. या वेळी मुख्यमंत्र्यांनी, गेल्या पाच वर्षांत नितेश यांनी विधानसभेत केलेल्या कामगिरीचे कौतुक केले. विधिमंडळात कोकणचे प्रश्न त्यांनी हिरिरीने मांडल्याचे सांगत अशा तरुण नेतृत्वाची पक्षाला गरज असल्याचेही नमूद केले. पण नारायण राणेंच्या शाळेत आक्रमकता शिकलेल्या नितेश यांच्या कार्यपद्धतीला संयमाची जोड आवश्यक असल्याचे स्पष्टपणे बजावत आमच्या पक्षाच्या शाळेत आम्ही तो शिकवू, अशा कानपिचक्याही दिल्या. सरकारी अधिकाऱ्यांविरुद्ध नितेश यांनी पूर्वी केलेल्या काही आंदोलनांचा संदर्भ या टिप्पणीमागे होता.  खासदार राणे यांनी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेता या दोन्ही भूमिका निभावताना दाखवलेल्या अभ्यासूपणाची प्रशंसा करताना, त्यांच्या ज्ञान, नेतृत्व आणि कर्तृत्वाचा पक्षाला मोठा लाभ होईल, असे फडणवीस यांनी नमूद केले. केंद्र आणि राज्य सरकारने कोकणात राबवलेल्या विविध कल्याणकारी योजनांची जंत्री देत सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सी-वर्ल्ड, विमानतळ, महामार्ग चौपदरीकरण इत्यादी योजनाही वेगाने पूर्ण करून पर्यटनाला मोठय़ा प्रमाणात चालना देण्याचा मनोदय मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला.

खासदार राणे यांनी या प्रसंगी बोलताना, आपण यापूर्वी शिवसेना आणि काँग्रेस पक्षामध्ये असताना त्या त्या पक्षांची ध्येयधोरणे प्रामाणिकपणे राबवली, तशीच आता भाजपचीही राबवू, अशी ग्वाही दिली.

सत्तर टक्के मते मिळतील

या निवडणुकीत नितेश यांना एकूण मतदानापैकी ६५ ते ७० टक्के मते मिळतील, असे भाकीत मुख्यमंत्री फडणवीस यांनीकेले. मात्र पूर्वीच जाहीर केल्याप्रमाणे शिवसेनेचा नामोल्लेखही केला नाही. राणे पिता-पुत्रांनीही आपल्या भाषणांमध्ये भाजपच्या शिस्तीचे पालन करण्याची हमी देताना शिवसेनेवर टीका टाळली.