आदित्य ठाकरे यांनी वरळी विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतल्याने शिवसैनिकांमध्ये उत्साहाचे वातावरण पसरले असले तरी शिवसेनेला या बदल्यात दोघांचे राजकीय पुनर्वसन करावे लागणार आहे. निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याचा निर्णय घेतल्यावर आदित्य यांनी कोणत्या मतदारसंघातून निवडणूक लढवायची याची चाचपणी सुरू केली. लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर वरळी मतदारसंघ निश्चित करण्यात आला. मग वरळीतील राजकीय वातावरण, पक्षांतर्गत विरोधक याचा आढावा घेण्यात आला. वरळी मतदारसंघाचे दोनदा प्रतिनिधित्व केलेले मुंबई राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी अध्यक्ष सचिन अहिर हे निवडणुकीत चुरस देऊ शकतात हे लक्षात घेऊन आदित्य यांच्या निवडणुकीचे व्यवस्थापन बघणाऱ्यांनी विविध पर्यायांचा विचार सुरू केला. सचिन अहिर हे गळाला लागतील का, याची चाचपणी करण्यात आली. नाही तरी मुंबईत राष्ट्रवादीची ताकद मर्यादितच आहे. युतीच्या विरोधात निवडून येणे आव्हानच होते. गेल्या निवडणुकीत युती नसतानाही सचिनभाऊंचा निभाव लागला नव्हता. राजकीय पुनर्वसनाचे आश्वासन मिळाल्याने सचिनभाऊनी हाताला शिवबंधन बांधून घेतले. वरळी मतदारसंघाचे आमदार सुनील शिंदे हे नाराज होणार नाहीत याचाही खबरदारी ‘मातोश्री’ला घ्यावी लागली. कारण विरोधक टपूनच बसलेले होते. उद्या शिंदे विरोधकांकडून रिंगणात उतरल्यास उलटा संदेश जायचा. शिंदे यांचेही समाधान करण्यात आले. आदित्य यांच्या आमदारकीचा मार्ग सुकर व्हावा म्हणून सचिन अहिर आणि सुनील शिंदे या आजी-माजी आमदारांचे राजकीय पुनर्वसन करावे लागेल. अहिर आणि शिंदे यांच्यापैकी पुनर्वसन आधी कोणाचे होणार, कोणाला विधान परिषदेची आमदारकी मिळणार हे सारेच मुद्दे चर्चेत राहतील.

समाजमाध्यमांतील चर्चा
निवडणुका जवळ आल्या की विविध पक्षांत प्रवेश सुरू होतात. त्यावेळी पक्षातील आधीचे निष्ठावंत आणि बाहेरून आलेले असा वाद कायम होत असतो. सत्तेतील पक्षही याला अपवाद नाही. अंबरनाथमध्ये असाच एक वाद शहरातल्या राजकारणी, पत्रकारांच्या व्हाट्सअॅ प ग्रुपवर नुकताच रंगला. अंबरनाथ नगरपालिका निवडणुकीत शिवसेना उमेदवाराविरूद्ध बंडखोरी करत एका शिवसेना पदाधिकाऱ्याने निवडणूक लढवून जिंकली होती. सध्या हा नगरसेवक शिवसेनेच्या गोटात दाखल झाला आहे. मात्र स्थानिक शिवसैनिकांमध्ये त्यांच्याविषयी असलेला संताप अनेकदा बाहेर येतो. अंबरनाथ विधानसभा मतदारसंघात एका इच्छुकाने दिलेल्या मुलाखतीवरून चर्चा सुरू असताना त्या चर्चेत पक्षाबाबत भूमिका घेऊ न बोलणे या नगरसेवकाला त्रासदायक ठरले. कारण या चर्चेत पुढे निष्ठावंत शिवसैनिकांनी या नगरसेवकाला खडेबोल सुनावले. त्यामुळे काही काळ तणावाचे वातावरण होते. मात्र चहाच्या पेल्यातील वादळाप्रमाणे हे वादळ शमले. या व्हाट्सअॅ्प वादाची चर्चा शहरातही रंगली होती.

मजकूर सहाय्य: संतोष प्रधान, सागर नरेकर