राज्यात पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीत काही मतदारसंघात सर्वपक्षीय उमेदवारांबाबत नाराज असलेल्या मतदारांनी थेट नोटा(यापैकी कोणीही नाही)वर आपल्या मतांची मोहोर उमटवित नाराजी व्यक्त केली आहे. पलूस -कडेगाव, लातूर ग्रामीण, बोरीवली अशा काही मतदार संघात विजयी उमेदवारानंतर दुसऱ्या क्रमांकावर नोटाला मते पडली आहेत. पुणे जिल्ह्य़ातील दौंड मतदार संघात तर भाजपचे राहुल यांच्या विजयात नोटाने महत्वपूर्ण भूमिका बजावल्याचे समोर आले आहे.

बुहसंख्य मतदारसंघांत जवळपास पाच हजार किंवा त्याहून अधिक मते नोटाला मिळाली आहेत. राज्यात कडेगाव-पलूस मतदारसंघातून काँग्रेसचे विश्वजित कदम एक लाख ५० हजार ८६६ मताधिक्याने विजयी झाले आहेत. मात्र, या मतदार संघात कदम यांच्यानंतर दुसऱ्या क्रमांकावर नोटाला तब्बल २० हजार ६३१ मते पडली असून, अन्य उमेदवारांना १० हजार पेक्षा कमी मते पडली आहेत. लातूर ग्रामीण विधानसभा मतदार संघातून काँग्रेसचे धीरज देशमुख एक लाख १८ हजारच्या मताधिक्याने विजयी झाले असून त्यांनी शिवसेनेचे सचिन उर्फ रवी देशमुख यांचा पराभव केला. याही मतदार संघात तब्बल १३ टक्के म्हणजेच २७ हजार २८७ मते नोटावर पडली आहेत. तर सेना उमेदवारास फक्त १३ हजार ३३५ मते मिळाली आहेत.

बोरीवली मतदारसंघात १० हजारांहून अधिक मते नोटावर पडली आहेत. सर्वात धक्कादायक बाब म्हणजे दौंड मतदारसंघातून भाजपाचे राहुल कुल केवळ ७४६ मताधिक्याने विजयी झाले आहेत. या ठिकाणी कुल यांना एक लाख तीन हजार ६६४ मते मिळाली असून त्यांचे प्रतिस्पर्धी राष्ट्रवादीचे रमेश थोरात यांना एक लाख दोन हजार ९१८ मते मिळाली तर या ठिकाणी नोटावर ९१७ मते पडली. जोगेश्वरी पूर्व मतदारसंघातही १२ हजार मतदारांनी नोटाचा पर्याय स्वीकारला. समाज माध्यमांवरील आवाहन आणि योग्य पर्याय नसल्यानेच काही मतदारसंघांमध्ये मतदारांनी नोटाचा पर्याय स्वीकारला असण्याची शक्यता आहे. आरेची वृक्षतोड किंवा अन्य काही मुद्दय़ांवर नोटाचा वापर करण्याचे आवाहन समाज माध्यमातून करण्यात आले होते.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नागपूर दक्षिण-पश्चिम मतदार संघात तीन हजारहून अधिक, तर भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या कोथरूड मतदार संघातही चार हजारहून अधिक मते नोटावर पडली आहेत. सत्ताधारी पक्षात सार्वधिक मताधिक्य भाजपाचे मुरबाडचे आमदार किसन कथोरे यांना एक लाख ३१ हजार मतांचे मिळाले आहे. मात्र, याही मतदार संघात सहा हजार ७८३ मतदारांनी नोटावर मत नोंदणी केली आहे. अक्कलकुवा मतदार संघातही शिवसेनेचे अमशा पाडवी यांना काँग्रेस उमेदवार के.सी. पाडवी यांच्याकडून केवळ दोन हजार ९६ मतांनी निसटता पराभव पत्करावा लागला. याही मतदार संघात नोटावर चार हजार ८५७ मते पडली असून येथेही जय-पराजयात नोटाची भूमिका महत्वाची ठरली आहे.

अधिकाऱ्यांनाही लागली आमदारकीची लॉटरी
विधानसभा निवडणुकीच्या माध्यमातून काही अधिकारीही विधानसभेत पोहोचले आहेत. निवृत्त सनदी अधिकारी आणि माजी राज्यपाल श्रीनिवास पाटील सातारा लोकसभा मतदार संघातून विजयी झाले असून, ते लोकसभेत तिसऱ्यांदा प्रवेश करणार आहेत. तर निवृत्त सनदी अधिकारी श्यामसुंदर शिंदे, स्वेच्छानिवृत्ती घेऊन राजकारणात उतरलेले पोलीस निरीक्षक राजेश पडवी आणि मुख्यमंत्र्याचे खाजगी सचिव अभिमन्यू पवार यांनाही आमदारकीची लॉटरी लागली आहे. अंधेरी पोलीस ठाण्यात कार्यरत असलेल्या पडवी यांनी निवडणुकीच्या तोंडावर नोकरीचा राजीनामा देऊन भाजपात प्रवेश केला. त्यांनी शहादा मतदारसंघात काँग्रेसचे पद्माकर वळवी यांचा पराभव करीत विधानसभेत प्रवेश केला आहे. आणखी एक निवृत्त सनदी अधिकारी शामसुंदर शिंदे यांनी दोनवेळा पराभव होऊनही जिद्द न सोडता या वेळी शेतकरी कामगार पक्षाकडून नांदेड मधील लोहा मतदार संघातून निवडणूक लढवत विजय मिळून विधानसभेत प्रवेश केला आहे.