लोकसभेला पाहिजे तसं यश मिळालं नाही. त्यामुळे कार्यकर्ते वेगळया मनस्थितीत होते. सत्ताधाऱ्यांनी त्या परिस्थितीचा फायदा उचलला. तुम्ही जिंकणार नाही. मतदारसंघाच्या विकासासाठी आमच्याकडे या अशा पद्धतीचा प्रचार केला आणि जीवाभावाचे सहकारी सोडून गेले. सगळे सोबत राहिले असते तर आज सरकार आणू शकलो असतो असे अजित पवार म्हणाले.

राष्ट्रवादी काँग्रेस विधिमंडळ पक्षाच्या नेतेपदी निवड झाल्यानंतर ते बोलत होते. राजकारणात असं घडलं असतं तसं घडलं असतं याला अर्थ नसतो. मॅजिक फिगर महत्वाची असते असे अजित पवार यांनी सांगितले. जनतेने आता कौल दिलाय. सत्ताधाऱ्यांना या दिवाळीत गोडधोड खाता आलं नाही. आपण मात्र समाधानी आहोत. यापुढे बेरोजगारी, शेतीच्या प्रश्नावर आक्रमक भूमिका मांडू असे अजित पवार म्हणाले.

आपण वेगवेगळया मतदारसंघात काही उमेदवारांना पाठिंबा दिला होता तो आकडा विचारात घेतला तर आपली संख्या ६० च्या पुढे जाते असे अजित पवार म्हणाले. बारामती विधानसभा मतदारसंघातून १ लाख ६५ हजार मताधिक्क्याने निवडून आलो यावर विश्वास बसत नाही. पूर्वी काका-पुतण्याचा संघर्ष होता. आता भावा-बहिणीचा संघर्ष सुरु आहे. त्या तुलनेत आमच्या बारामतीत बरं चालू आहे असे अजित पवार म्हणाले. साताऱ्यातील श्रीनिवास पाटील यांच्या विजयाचेही कौतुक केले. साताऱ्यातील जनता यशवंतराव चव्हाणसाहेबांनंतर आता शरद पवार साहेबांसोबत आहे असे अजित पवार म्हणाले. सर्वांना सोबत घेऊन विधिमंडळातील काम उजवं कसं होईल त्यासाठी प्रयत्न करेन असे अजित पवार म्हणाले.