विधानसभा निवडणुकीत अनेक दिग्गजांच्या लढतीकडे लक्ष असून ऐरोलीतून गणेश नाईक यांनी २४ हजार मतांनी आघाडी घेतली आहे. गणेश नाईक यांनी विधानसभा निवडणूक तोंडावर असतानाच राष्ट्रवादी काँग्रेसला सोडचिठ्ठी देत भाजपात प्रवेश केला होता. गणेश नाईक यांच्या भाजपा प्रवेशामुळे स्थानिक आमदार मंदा म्हात्रे यांनी नाराजी व्यक्त करत तिकीट न मिळाल्यास बंडखोरी करण्याचा इशारा दिला होता. विशेष म्हणजे भाजपाने गणेश नाईक यांचा मुलगा संदीप नाईक यांना ऐरोलीतून उमेदवारी दिली होती. पण त्यांनी वडिलांसाठी माघार घेत गणेश नाईक यांना आपल्या जागी लढण्याची संधी दिली.

ऐरोलीतून गणेश नाईक यांच्याविरोधात राष्ट्रवादीकडून गणेश शिंदे आणि मनसेकडून निलेश बाणखेले यांना उमेदवारी देण्यात आली आहे.

काहीही झालं तरीही बेलापूरची आमदार मीच असेन असं मंदा म्हात्रे यांनी गणेश नाईक यांच्या भाजपा प्रवेशाच्या आधी आणि त्यांच्या भाजपा प्रवेशाच्या वेळीही सांगितलं होतं. गणेश नाईक यांना भाजपात घेण्यासाठी मंदा म्हात्रे यांनी विरोधही दर्शवला होता. मात्र भाजपाने त्यांची समजूत घातली होती. गणेश नाईक यांच्या भाजपा प्रवेशाच्या कार्यक्रमातही मंदा म्हात्रे उपस्थित होत्या. मात्र त्यांना आपलं तिकिट कापलं जाण्याची भीती होती. पण भाजपाने त्यांना नाराज न करता बेलापूरमधून तिकीट दिलं आहे.

मतदानोत्तर चाचण्यांमध्ये युतीला चांगलं यश मिळेल असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. या पार्श्वभुमीवर युतीला किती जागा मिळणार, यात भाजपाच्या किती जागा असतील याची सर्वत्र उत्सुकता आहे. १९८५ च्या निवडणुकीनंतर राज्यात कोणत्याही एका पक्षाला १४५ चा जादुई आकडा गाठता आलेला नाही. १९९० मध्ये काँग्रेसला चार जागा कमी पडल्या होत्या. १९९५ पासून राज्यात युकी किंवा आघाडीची सरकारे सत्तेत आली.

युतीला वातावरण अनुकूल असले तरी भाजपा किती जागांचा पल्ला गाठणार याची साऱ्यांनाच उत्सुकता आहे. भाजपाला १३० ते १३५ जागा मिळतील, असा दावा पक्षाचे नेते करीत आहेत. भाजपचे १४५चा जादुई आकडा गाठण्याचे स्वप्न यंदा साकार होण्याची शक्यता कमी दिसते.

शिवसेनेचे मावळत्या सभागृहात ६३ आमदार होते. शिवसेनेच्या जागा वाढतात की घटतात याबाबतही लक्ष लागले आहे. शिवसेनेच्या आमदारांची संख्या जास्त वाढू नये, असाच भाजपचा प्रयत्न होता. काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे पानिपत होईल, असा दावा युतीचे नेते करीत आहेत. गतवेळी काँग्रेस ४२ तर राष्ट्रवादीचे ४१ आमदार निवडून आले होते. तेवढे यश मिळाले तरीही आघाडीसाठी समाधानकारक असेल.