नालासोपारा विधानसभा मतदारसंघातून सहा उमेदवार रिंगणात असले तरी बविआचे क्षितिज ठाकूर आणि शिवसेना-भाजप महायुतीचे प्रदीप शर्मा यांच्यातील लढतीकडे सर्वाच्या नजरा लागून आहेत. प्रत्यक्ष मतदानापूर्वी प्रचारकाळात उभय बाजूंच्या समर्थकांमध्ये समाजमाध्यमांतून जबरदस्त खडाजंगी झाली होती. या पार्श्वभूमीवर नालासोपारा मतदारसंघात कोण बाजी मारणार याकडे मतदारांचे लक्ष आहे. दरम्यान सुरु असलेल्या मतमोजणीत बविआचे क्षितिज ठाकूर २० हजार १५० मतांनी आघाडीवर आहेत. आठव्या फेरीत त्यांना ५३ हजार २६९ मिळाली असुन शिवसेनेच्या प्रदीप शर्मा यांना ३३ हजार ११९ मते मिळाली आहेत.

वसई, नालासोपाऱ्यात कोण सरस?

गुरुवारी सकाळी ८ वाजता वसईच्या संत गोन्सालो गार्सिया महाविद्यालयात मतमोजणीची प्रक्रिया सुरू झाली. दुपारी साधारणत: एक ते दोनच्या दरम्यान मतमोजणी पूर्ण होऊन अंतिम निकाल येण्याची शक्यता आहे. या वेळी कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी मतमोजणी परिसरात पोलिसांसह केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल आणि निमलष्करी दलाच्या जवानांची त्रिस्तरीय सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली आहे, अशी माहिती निवडणूक निर्णय अधिकारी स्वप्निल तांगडे यांनी दिली.

वसईतील संत गोन्सालो गार्सिया महाविद्यालयात होत असलेल्या मतमोजणीवेळी सुरक्षेच्या दृष्टीने प्रशासन सज्ज असून त्रिस्तरीय सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली आहे. सुरक्षेचा पहिला स्तर हा वसई तहसील कार्यालय आणि वसई बस डेपो येथे असेल. या ठिकाणी अडथळे ठेवण्यात येणार असून पोलीस तैनात असणार आहेत. त्यानंतर सुरक्षेचा दुसरा स्तर हा महाविद्यालयाच्या प्रवेशद्वारावर असेल. त्यानंतर तिसरा स्तर हा केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाच्या (सीआयएसएफ) ५० जवानांचा प्रत्यक्ष मतमोजणीच्या ठिकाणी असणार आहे. याशिवाय निमलष्करी दलाच्या जवानांची कुमकही सुरक्षेसाठी तैनात असणार आहे.

मतमोजणीच्या ठिकाणी फक्त मतमोजणी करणारे अधिकारी आणि कर्मचारी यांनाच प्रवेश आहे. उमेदवारांचे प्रतिनिधी मतमोजणीच्या ठिकाणी येऊ शकतील. शिवाय निवडणूक यंत्रणेकडून ओळखपत्र देण्यात आलेले माध्यमांचे प्रतिनिधी यांनाच मतमोजणीच्या ठिकाणी येण्यास परवानगी असेल.   – स्वप्निल तांगडे, निवडणूक निर्णय अधिकारी, वसई विधानसभा मतदारसंघ