भाजपा महायुतीच्या उमेदवार पंकजा मुंडे यांच्यावर गलिच्छ व बिभत्स भाषेत टीका करणा-या राष्ट्रवादी काँग्रेसच्या धनंजय मुंडे यांच्या विरोधात शहर पोलीस ठाण्यात रात्री गुन्हा दाखल झाला आहे. दरम्यान धनंजय मुंडे यांच्यावर कारवाई व्हावी यासाठी भाजपने महिला आयोग आणि निवडणूक आयोगाकडेही तक्रार केली आहे.

धनंजय मुंडे यांनी विडा येथे झालेल्या प्रचार सभेत पंकजा मुंडे यांच्या विरुद्ध बोलतांना अतिशय खालच्या पातळीवर जाऊन गलिच्छ व बिभत्स भाषेत टीका केली होती, टिकेचा व्हिडिओ आज मोठ्या प्रमाणात व्हायरल झाल्यानंतर धनंजय मुंडे विरोधात पंकजा मुंडे समर्थक, वंजारी समाज आणि सर्व सामान्य नागरिकांमध्ये संतापाची लाट पसरली. भाजपा महायुतीच्या परळी येथे झालेल्या समारोपाच्या सभेत या विषयावर आक्रमक पवित्रा घेत पंकजा  मुंडे यांनी धनंजय मुंडेवर कडाडून हल्ला चढवला होता. भाषणानंतर त्यांना भोवळ आल्याने कार्यकर्त्यांचा उद्रेक झाला.

दरम्यान, पंकजा मुंडे यांच्या विषयी गलिच्छ भाषा वापरणा-या धनंजय मुंडे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यासाठी संतप्त कार्यकर्ते पोलिस ठाण्यावर धडकले. भाजपचे शहराध्यक्ष जुगलकिशोर लोहिया यांनी दिलेल्या फिर्यादीवरून धनंजय मुंडे विरूध्द कलम ५००,५०९,२९४ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सर्वत्र संतापाचा उद्रेक

धनंजय मुंडे यांच्या वक्तव्याचा निषेध करण्यासाठी हजारो महिलांचा जमाव यश:श्री निवासस्थानी जमा झाला आहे.परळीसह संपूर्ण जिल्ह्यात संतापाची लाट निर्माण झाली असून ठिकठिकाणी धनंजय मुंडे यांचा निषेध केला जात आहे.महिला वर्गाच्या भावना तीव्र झाल्या असून बहिणीबद्दल गलिच्छ वक्तव्य करणारे धनंजय मुंडे सामान्य महिलांचा काय सन्मान करणार असा सवाल महिला करीत आहेत.या प्रकारामुळे ऐन मतदानाच्या तोंडावर परळीचे राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे.