महाराष्ट्रासह हरयाणा विधानसभेसाठी सोमवारी मतदानपार पडलं. सर्वसामान्यांपासून राजकीय नेते, बॉलिवूड कलाकार, क्रिकेटपटूंनी त्यांचा मतदानाचा हक्क बजावला. यावेळी अभिनेत्री जया बच्चन यांनीही मतदान केलं, पण मतदानानंतर मात्र त्या मतदान केंद्रावरील अधिकाऱ्यावर चांगल्याच संतापल्याचं वृत्त झी न्यूजने दिलं आहे.

या वृत्तानुसार, मुंबईतील जुहूच्या मतदान केंद्रावर मतदानासाठी ऐश्वर्या राय-बच्चन, अभिषेक बच्चन यांच्यासह जया बच्चन पोहोचल्या होत्या. मतदानानंतर जया बच्चन बाहेर येताच मतदान केंद्रावरील एका अधिकाऱ्याने जया यांच्याकडे फोटो काढण्याची विनंती केली. अधिकाऱ्याच्या फोटो काढण्याच्या मागणीवर जया बच्चन यांचा पारा चढला.

‘मी या ठिकाणी मतदान करण्यासाठी आले आहे. तुम्ही निवडणूक अधिकारी आहात. ड्युटीवर असताना तुम्ही अशाप्रकारे फोटो मागू शकत नाहीत. मी तुमची तक्रार करणार आहे,’ असे त्यांनी फोटो मागणाऱ्या त्या अधिकाऱ्याला सुनावले. यानंतर त्या माध्यमांवर देखील भडकलेल्या दिसल्या. उपस्थित कॅमेरामॅनला धक्का देत त्या आपल्या कारमध्ये जाऊन बसल्या.


राज्यात विधानसभा निवडणुकीसाठी २८८ मतदारसंघांमध्ये सोमवारी मतदान पार पडले असून, सरासरी ६०.४६ टक्के मतदान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. सन २०१४च्या तुलनेत यावेळी मुंबई शहर तसेच ठाणे जिल्ह्यासह राज्यभरात मतटक्का घसरला असून, मुंबई उपनगरांमध्ये मात्र मतदानात वाढ झाल्याचे दिसून आले. मतदानोत्तर चाचण्यांनी भाजप-शिवसेना युतीचीच पुन्हा सत्ता येणार असल्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.