26 May 2020

News Flash

रोजगारात महाराष्ट्र मागे होता तो पहिल्या क्रमांकावर आणला – फडणवीस

"त्याचबरोबर एकही खड्डा पडणार नाही अशा रस्त्यांचं जाळं या सोलापूरमध्ये आम्ही तयार करु. सोलापूर जिल्ह्यातून चारही दिशांना आपण काँक्रिटचे रस्ते नेत आहोत."

नातेपुते : राम सातपुते या महायुतीच्या उमेदवाराच्या प्रचारसभेत बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस.

यापूर्वी पंधरा वर्षांच्या काँग्रेस-राष्ट्रवादीच्या सरकारमध्ये रोजगारात महाराष्ट्र मागे होता तो गेल्या पाच वर्षांत आम्ही पहिल्या क्रमांकावर आणला, असा दावा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. सोलापूर जिल्ह्यातील नातेपुते येथे राम सातपुते या महायुतीच्या उमेदवाराच्या प्रचारादरम्यान ते बोलत होते.

फडणवीस म्हणाले, महाराष्ट्राचं सकल उत्पन्न आधी १६ लाख कोटी रुपये होतं आज ते २६ लाख कोटी झालं आहे. आमच्या सरकारने राज्याच्या तिजोरीत १० लाख कोटी रुपयांची भर टाकली आहे. पाच वर्षांपूर्वी शिक्षणात महाराष्ट्र १८व्या क्रमांकावर होता तो आता तिसऱ्या क्रमांकावर आणला. आरोग्यात महाराष्ट्र ६ व्या क्रमांकावर होता तो तिसऱ्या क्रमांकावर आणला. उद्योगात महाराष्ट्र मागे गेला होता तो पहिल्या क्रमांकावर आणला. गुंतवणूकीत आणि रोजगारात महाराष्ट्र मागे होता तो ही पहिल्या क्रमांकावर आणण्याचे काम आमच्या सरकारनं केलं आहे.

पंधरा वर्षे काँग्रेस-राष्ट्रवादीने महाराष्ट्रातील जनतेची केवळ दिशाभूल करण्याचे काम केले. गेल्या पाच वर्षांत आम्ही राज्यातील जनतेच्या सर्व समस्या सोडवल्या असा दावा करणार नाही. मात्र, पंधरा वर्षांतील काँग्रेस-राष्ट्रवादीच्या कामाच्या तुलनेत गेल्या पाच वर्षांत आम्ही त्यांच्यापेक्षा दुप्पट कामं केली आहेत, हा दावा आम्ही निश्चित करु शकतो असे मुख्यमंत्री यावेळी म्हणाले.

फडणवीस म्हणाले, “शेतकऱ्याला केवळ मदत करुन उपयोग नाही त्यांच्यापर्यंत पाणीही पोहोचवायला पाहिजे या भावनेतून आम्ही काम करतो आहोत. गेल्या पाच वर्षात पश्चिम महाराष्ट्रातील सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर आणि पुणे जिल्ह्यात सिंचनाचे प्रलंबित कामं पूर्ण करण्याचं काम आमच्या सरकारने केलं. जलयुक्त शिवार योजनेच्या माध्यमातून एकट्या सोलापूर जिल्ह्यातील ९२३ गावांना दुष्काळमुक्त करण्याचे काम केलं. आता या पुढील पाच वर्षात दुष्काळमुक्त महाराष्ट्र करण्यासाठी आम्ही काम करणार आहोत.”

कृष्णा-भीमा अस्तरीकरणामुळे सोलापूर जिल्हा आणि सांगलीचा काही भाग असलेला मोठा दुष्काळी पट्टा कायम दुष्काळातून मुक्त होणार आहे. लोकसभा निवडणुकीच्या या अस्तरीकरणाचं आश्वासन आम्ही दिलं होतं त्यानंतर आता पाच महिन्यांमध्ये या कामात प्रगती झाल्याचे मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितलं. ते म्हणाले, वर्ल्ड बँक आणि एशिअन डेव्हलपमेंट बँकेच्या २२ तज्ज्ञांनी धरणाच्या अतिरिक्त पाण्यामुळे निर्माण होणाऱ्या पुरस्थितीवर उपाय सांगितला आहे. त्यासाठी डायव्हर्जन कॅनॉल तयार करण्यात येणार असून जमिनीखालून ते दुष्काळी भागात नेले जाणार आहेत. याला तत्वतः मान्यता देण्यात आली असून हे पाणी सर्वप्रथम कृष्णा-भीमा अस्तरीकरण प्रकल्पात वळवण्यात येणार आहे. यामुळे अतिरिक्त पाणी या भागात येईल आणि इथे पाण्याचे दुर्भिक्ष राहणार नाही. येत्या पाच वर्षात हे स्वप्न पूर्ण करण्याचे वचन देतो, असे मुख्यमंत्री यावेळी म्हणाले.

त्याचबरोबर एकही खड्डा पडणार नाही अशा रस्त्यांचं जाळं या सोलापूरमध्ये आम्ही तयार करु. सोलापूर जिल्ह्यातून चारही दिशांना आपण काँक्रिटचे रस्ते नेत आहोत. वारी मार्गही असाच काँक्रिटचा बनवण्यात येणार आहे. त्यामुळे वारकऱ्यांना कुठलाही त्रास होणार नाही. अनेक वर्षांपासून सुटला नव्हता तो धनगर समाजाच्या आरक्षणाचा प्रश्नही आम्ही सोडवला आहे. कोर्टात हा प्रश्न शेवटच्या टप्प्यात असतानाही आम्ही तिथं प्रतिज्ञापत्र दाखल केलं आहे. तसेच आदिवासींना ज्या २२ योजना लागू आहेत त्या सर्व धनगरांना लागू करण्यात आल्या आहेत. त्यासाठी १ हजार रुपयाची तरतूदही करण्यात आली आहे. तसेच ओबीसी समाजासाठी वेगळं मंत्रालय तयार करुन ३,००० कोटी रुपयांचा निधी देण्यात आला असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 10, 2019 4:27 pm

Web Title: maharashtra was far behind in employment now it is at first position says cm fadnavis aau 85
Next Stories
1 नांदेडात नदीच्या पाण्यात पडून दोन बालकांचा दुर्दैवी मृत्यू
2 रस्त्यावर सभा घेण्याची संमती द्या, मनसेचं निवडणूक आयोगाला पत्र
3 राहुल मोटेंना रोखत शिवसेनेचे तानाजी सावंत विधानसभेत जाणार?
Just Now!
X