भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना विधानसभा निवडणूक लढवण्यासाठी कोथरूडमधून उमेदवारी मिळाल्यानंतर समाजमाध्यमांतून टीकेचा सूर कायम आहे. ‘चंद्रकांत पाटील यांचा कोथरूडमध्ये मागच्या दाराने प्रवेश’, ‘कोथरूडपासून राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ४ जवळच आहे’, ‘आयत्या कोथरुडात कोल्हापूरचा चांदोबा’ असे खास पुणेरी चिमटे समाजमाध्यमांतून काढले जात आहेत.

आमदार मेधा कुलकर्णी यांच्याऐवजी चंद्रकांत पाटील यांना कोथरूडमधून उमेदवारी देण्यावरून वाद आणि चर्चा रंगली होती. याच वेळी समाजमाध्यमांतून उपहासात्मक भाष्यही केले जात आहे. फेसबूक, ट्विटर, व्हॉट्सअॅतप अशा विविध समाजमाध्यमांमध्ये चंद्रकांत पाटील यांच्यावरील विनोद फिरत आहेत.

‘दादा तुम्ही फक्त डेक्कनपासून डहाणूकर कॉलनीपर्यंत रस्ता न विचारता येऊन दाखवावे, मग आम्ही समजू तुम्ही पुणेकर!’, ‘कधीही पराभव पाहिला नाही असे म्हणणाऱ्या चंद्रकांत पाटील यांना बारामतीमधून लढण्यास काय हरकत होती?’, ‘उमेदवार हा स्थानिक असावा, पुरात वाहून आलेला नसावा’, ‘जावई आहात तर जावयासारखे राहा, घरजावई का होताय?’, ‘पुणे आताच का आठवलं?’ अशा पद्धतीने टिपण्या समाजमाध्यमांतून करण्यात येत आहेत.

आणखी वाचा- ‘मुख्यमंत्रिपदाची अपेक्षा नाही’

पाठिंबाही.. : समाजमाध्यमांतून एकीकडे टीका केला जात असताना चंद्रकांत पाटील यांना कोथरूडमधून लढण्यासाठी पाठिंबाही दिला जात आहे. ट्विटरवर टीकात्मक पोस्टना पाटील यांच्या समर्थकांकडून पाठिंबा देणाऱ्या पोस्टद्वारे उत्तरही देण्यात येत आहे. त्यामुळे विरोध आणि पाठिंबा असा दुरंगी सामना समाजमाध्यमांमध्ये आहे.