उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या अखेरच्या दिवशी राजकीय वर्तुळात रंजक घडामोडी घडताना दिसत आहेत. यामध्ये नाशिकमधील एका राजकीय घटनेने महाराष्ट्राचे लक्ष वेधलं आहे. नाशिक पूर्व मतदारसंघात कोथरूड पॅटर्नची पुनरावृत्ती झाली आहे. याठिकाणी मनसेचे अधिकृत उमेदवार माजी महापौर अशोक मुर्तडक यांनी माघार घेतली असून राष्ट्रवादीच्या बाळासाहेब सानप यांना पाठींबा दिला आहे.

नाशिकमध्ये पाठिंबा देऊन मनसेने राष्ट्रवादीची परतफेड केल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. भाजपमधून बंडखोरी करून राष्ट्रवादीच्या तिकीटावर उभे असलेले बाळासाहेब सानप यांच्या पाठिशी विरोधक आपली ताकद उभी करत असल्याचे चित्र निर्माण झाले आहे. नाशिक पूर्व मधून माघार घेतलेली मनसेचे अशोक मुर्तडक यांनी मला पक्षाने भरपूर काही दिले आहे. साहेबांच्या आदेशाने मी उमेदवारी अर्ज मागे घेत असल्याचे त्यांनी स्पष्टीकरण दिले.

सानप आणि मुर्तडक एकाच समाजाचे असल्याने मतविभागणीचे संकट दोन्ही पक्षांसमोर होते. मात्र, आता मनसेने माघार घेतल्यामुळे आणि अन्य विरोधकांच्या पाठींब्यामुळे इथं भाजपा आणि राष्ट्रवादीमध्ये सरळ लढत आहे. नाशिक मध्य मतदारसंघात महायुतीकडून आमदार देवयानी फरांदे या उमेदवार आहेत. फरांदे यांच्या विरोधातील मतविभागणी टाळण्यासाठी काँग्रेसने माघार घेऊन मनसेला सोबत घेऊन ही व्यूहरचना आखल्याची चर्चा आहे.

आणखी वाचा- अमित घोडांनी आठवडाभरातच ‘घड्याळ’ काढलं, पुन्हा ‘धनुष्यबाण’ घेणार हाती

यापूर्वी कोथरूडमध्येही असाच प्रकार पाहायला मिळाला होता. याठिकाणी विरोधकांकडून एकमताने मनसेच्या किशोर शिंदे यांच्या पाठिशी ताकद उभी करण्यात आली आहे. यंदा कोथरूडमध्ये भाजपतर्फे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील रिंगणात उतरले आहेत. मात्र, विद्यमान आमदार मेधा कुलकर्णी यांना उमेदवारी नाकारल्यामुळे कोथरूडमध्ये ब्राह्मण विरुद्ध मराठा असा वाद निर्माण झाला आहे.