राज्यातील निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बुधवारी पुण्यामध्ये मनसेप्रमुख राज ठाकरे यांची पहिली प्रचारसभा पावसामुळे रद्द झाली. या सभेपासून राज ठाकरे विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराचे रणशिंग फुकणार होते. पण पावसाच्या खेळामुळे अखेर ही सभा रद्द करावी लागली. पावसाने क्षणभर विश्रांती घेतल्यानंतर सभा रद्द होऊ नये यासाठी कार्यकर्त्यांनी लगेच मैदान सुकवण्याचा प्रयत्न केला. मात्र, पुन्हा एकदा पावसाने हजेरी लावल्यामुळे अखेर सभा रद्द करण्यात आली.

‘मेघ’ गर्जनेमुळे पुण्यात सभा रद्द झाल्यानंतर गुरूवारी मनसे प्रमुख राज ठाकरेंची मुंबईत सभा होणार आहे. राज ठाकरे यांच्या मुंबईत दोन सभांचे आयोजन करण्यात आले आहे. या सभेद्वारे राज ठाकरे विधनसभा निवडणुक प्रचाराचा नारळ फोडणार आहेत. राज ठाकरे यांची सायंकाळी सहा वाजता पहिली सभा मुंबईतील सांताक्रुझमधील मराठा कॅालनीमध्ये आणि दुसरी सभा गोरेगावमधील आझाद मैदानात आयोजित करण्यात आली आहे.

बऱ्याच दिवसांपासून शांत असलेले राज ठाकरे आज काय बोलणार ? त्यांच्या निशाण्यावर कोण असणार? भाजप-शिवसेनेची कुठली प्रकरणे ते बाहेर काढणार? याबद्दल राजकीय तज्ञांपासून सर्वांनाच उत्सुक्ता आहे. मध्यंतरी राज ठाकरे यांना ईडीने चौकशीसाठी बोलवले होते. त्यानंतर राज ठाकरे शांत झाले होते. एरवी राज ठाकरे सोशल मीडियावर बरेच सक्रीय असतात. पण तिथे सुद्धा त्यांनी काहीही भाष्य केले नाही. त्यामुळे मनसे निवडणुकीच्या रिंगणात उतरणार की नाही याबद्दल अनिश्चितता निर्माण झाली होती. नेते आणि कार्यकर्त्यांची निवडणूक लढवण्याची इच्छा होती. अखेर राज ठाकरे यांनी निवडणूक रिंगणात उतरण्याचा निर्णय घेतला.

मुंबई, पुणे, नाशिक या शहरी भागात मनसेचे बऱ्यापैकी वर्चस्व आहे. त्यामुळे मनसेने उमेदवारी देताना ग्रामीण भागापेक्षा शहरी भागावर जास्त लक्ष केंद्रीत केले आहे. गेल्यावेळी लोकसभा निवडणुकीच्या वेळ मनसेचे उमेदवार रिंगणात उतरले नव्हते. पण राज ठाकरे यांची प्रत्येक सभा गाजली होती. भर सभेमध्ये व्हिडिओ दाखवून राज ठाकरे मोदी सरकारच्या आश्वासनांची पोलखोल करत होते.