यंदाच्या विधानसभा निवडणुकीत उतरायचे की नाही? यावर दिर्घ चिंतन केल्यानंतर कार्यकर्ते आणि पक्षातील नेत्यांच्या आग्रहामुळे राज ठाकरेंनी मैदानात उतरण्याचा निर्णय घेतला. लोकसभा निवडणुकीत ‘लाव रे तो व्हिडीओ’ म्हणत सत्ताधारी भाजपाला धडकी भरवणाऱ्या मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची आज पहिली सभा होत आहे. पहिल्या सभेत राज यांच्या प्रचाराचं नेमकं तंत्र काय असेल, कोणत्या मुद्यांना ते हात घालतील याबद्दल सगळ्यांनाच उत्सुकता होती. पण पुण्यातील सभा पावसामुळे रद्द झाली. दरम्यान, मुंबईत आज (१० ऑक्टोबर) राज ठाकरे यांच्या दोन सभा होत आहेत. ‘लाव रे तो व्हिडीओ’ म्हणत राज ठाकरे सरकारवर हल्ला चढवणार की, नवीन अस्त्र बाहेर काढणार, हे सभेतच कळणार आहे.

लोकसभा निवडणुकीनंतर राज ठाकरे यांना ईडीने चौकशीसाठी बोलवले होते. त्यानंतर राज ठाकरे शांत झाले होते. बऱ्याच दिवसांपासून शांत असलेले राज ठाकरे आज कशी डरकाळी फोडणार? सभांमध्ये नवीन काय बोलणार ? त्यांच्या निशाण्यावर कोण असणार? भाजप-शिवसेनेची कुठली प्रकरणे ते बाहेर काढणार? याबद्दल महाराष्ट्रातील जनतेसह, विरोधक, सत्ताधारी आणि राजकीय तज्ञांपासून सर्वांनाच उत्सुक्ता लागली आहे.

यंदा लोकसभा निवडणुकीच्या वेळी ‘लावा रे तो व्हिडिओ’ची सोशल मीडियावर चांगलीच चर्चा होती. राज ठाकरे यांच्या आक्रमक प्रचारामुळे त्यावेळी आशिष शेलार यांना प्रेझेंटेशन करुन मनसेच्या आरोपांना उत्तरही द्यावे लागले होते. नरेंद्र मोदींच्या जुन्या भाषणांच्या क्लिप्स, वर्तमानपत्रातील कात्रणं, हरिसाल गावचा तरुण, ‘मी लाभार्थी’च्या जाहिरातीत फोटो वापरलेलं – पण लाभार्थी नसलेलं कुटुंब, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दत्तक घेतलेल्या गावातील परिस्थिती, महाराष्ट्रातील डिजिटल गावातील स्थिती, सत्ताधाऱ्यांच्या जाहिरातींची पोलखोल, हे सगळं राज ठाकरेंनी ‘लाव रे तो व्हिडीओ’ म्हणत स्टेजवरून दाखवलं होतं. यामाध्यामातून केंद्रातील मोदी सरकारनं कसं फसवलं हे पटवून देण्याचा प्रयत्न केला होता. सुरुवातीला सगळ्यांनाच हे ‘भारी’ वाटलं. कारण, प्रचाराची ही स्टाईल नवी होती आणि त्याला राज ठाकरेंच्या वक्तृत्वाची, जोड होती. पण, कालांतराने त्यात तोच-तोचपणा येत गेला आणि त्या पडद्यामागचं वस्तुस्थितीही मतदारांच्या लक्षात आली आसावी.

पुलवामा दहशतवादी हल्ल्याबद्दल संशय व्यक्त करणं, एअर स्ट्राईकवरून अजित डोवालांना लक्ष्य करणं हे अनेक मनसैनिकांनाही ‘मनसे’ पटलं नव्हतं. त्यामुळेच ‘लाव रे तो व्हिडिओ’चा म्हणावा तसा ‘इम्पॅक्ट’ झाला नसल्याचे काही राजकीय तज्ञ्जांचं मत आहे. विधानसभा निवडणुकीचा प्रचारात भाजपा-शिवसेनेच्या तुलनेत मनसेचा प्रचार अद्याप सुरू झाला नसला, तरी राज यांच्या एका सभेने सगळे वातावरण बदलू शकते. राज यांनी दिलेले काही उमेदवार नवखे असले तरी राज यांना मानणारा मोठा वर्ग आहे. त्यांच्यावर राज यांच्या भाषणाचा प्रभाव पडू शकतो. लोकसभेला मोदी-शाह यांच्या विरोधात जोरदार प्रचार केला. मात्र, त्याचा परिणाम दिसला नाही. मनसेने उमेदवार द्यावे, अशी मागणी त्यावेळी झाली होती. आता मनसे निवडणुकीत उतरली असून, पुन्हा राज विरुद्ध शिवसेना-भाजपा असा सामना रंगू शकतो. पण, मनसे ‘राज’नीती बदलणार? की ‘लाव रे तो व्हिडीओ’ या जुन्याच अस्त्रात नवीन दारू भरणार याकडे राज्याचे लक्ष लागले आहे.