शिवसेना खासदार संजय मंडलिक यांच्या विजयात भाजपाचाही सिंहाचा वाटा आहे. “आमचं ठरलयं”ची मदत झाल्याचे सांगत ते विरोधकांना मदत करत असतील, तर भाजपाची त्यांना मदत झाली नाही का? असा प्रश्न भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी मंडलिक यांना विचारला. एका लुगड्याने बाई म्हातारी होत नाही, असा सूचक इशाराही शिवसेना खासदार संजय मंडलिक यांना यावेळी दिला. अजूनही वेळ गेलेली नाही, त्यांनी युतीधर्म पाळावा, असे आवाहन केले. लोणार वसाहत येथील गणेश मंगल कार्यालयात आयोजित भाजप – ताराराणी आघाडी कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात ते बोलत होते.

पाटील यांच्या ‘एका लुगड्याने बाई म्हातारी होत नाही’ या वक्तव्याला गर्दीने खचाखच भरलेल्या कार्यकर्त्यांनी टाळ्यांचा कडकडाट करून दाद दिली. प्रदेश उपाध्यक्ष धनंजय महाडिक, दक्षिणचे उमेदवार आमदार अमल महाडिक, जिल्हा परिषद अध्यक्षा शौमिका महाडिक, यांच्यासह प्रमुख नेते यांच्या उपस्थितीत मेळावा झाला.

पवार तुम्हाला पाटील कळलेच नाहीत
“चंद्रकांत पाटील यांना कोथरूडमध्ये अडकवून ठेवल्याचं शरद पवार सांगत आहे. पण त्यांना पाटील कळलेलेच नाहीत. पाटील चेहऱ्यावर कोणताही भाव न आणता कसा फटका लगावतो हे समजतही नाही,” असं चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं आहे. शरद पवार यांनी यावरुन पाटील यांना लक्ष्य करत चंद्रकांत पाटील यांना कोथरूडमध्येच अडकवून ठेवले आहे, त्यांना इतरत्र जाता येत नाही असे विधान करीत विरोधकांनी पाटील यांची कोंडी केली असल्याचे म्हटले होते. शरद पवार यांच्या विधानाचा समाचार आज पाटील यांनी कोल्हापुरात उपरोक्त विधान करत घेतला. कोल्हापूर उत्तर मतदारसंघातील शिवसेनेचे उमेदवार आमदार राजेश क्षीरसागर यांच्या प्रचारासाठी झालेल्या पदाधिकारी, कार्यकर्ता मेळाव्यात बोलताना पाटील यांनी ‘पवार तुम्हाला पाटील कळलेच नाहीत, असा टोलाही लगावला.