पंकजा मुंडे यांच्यावर गलिच्छ व बिभत्स भाषेतील व्हिडीओ बनावटी असून ती क्लीप एडिट करून व्हायरल करण्यात केली आहे. व्हिडीओ क्लिप माझ्या वक्तव्याचा विपर्यास करणारी आणि जाणीवपूर्वक माझी बदनामी करणारी आहे, असा खुलासा धनंजय मुंडे यांनी दिला आहे. रात्री उशीरा धनंजय मुंडे यांच्याविरोधात परळी पोलीस स्टेशनध्ये गुन्हा दाखल करण्यात आला. त्यानंतर धनंजय मुंडे यांनी फेसबुक पोस्टद्वारे खुलासा केला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

धनंजय मुंडे यांनी पंकजा मुंडे यांच्यावर खालच्या भाषेत टीका केल्याचा एक व्हिडीओ व्हायरल झाला होता. त्यानंतर पंकजा मुंडे समर्थकांनी धनंजय मुंडे त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यासाठी पोलीस ठाण्यात ठिय्या दिला होता. त्यानंतर धनंजय मुंडे यांच्या विरोधात गुन्हा देखील दाखल करण्यात आला आहे. दरम्यान धनंजय मुंडे यांच्यावर कारवाई व्हावी यासाठी भाजपने महिला आयोग आणि निवडणूक आयोगाकडेही तक्रार केली आहे.

शनिवारी माझ्या वक्तव्याबद्दल सोशल मीडियावर व्हायरल झालेली ती क्लिप एडिट करून, माझ्या वक्तव्याचा विपर्यास करणारी आणि जाणीवपूर्वक माझी बदनामी करणारी आहे. ती क्लिप पूर्णपणे चुकीची असून त्याची सत्यता फॉरेन्सिक लॅबमध्ये तपासावी अशी मागणी स्वतः धनंजय मुंडे यांनी केली आहे.

अशी क्लिप एडिट करणाऱ्यांनी किमान बहिण-भावाच्या पवित्र नात्याचा तरी आदर ठेवावा , आपली निवडणूक विकास कार्यावर आहे, ती भावनिकतेवर घेऊन जाताना इतकी खालची पातळी गाठू नका ही कळकळीची विनंती त्यांनी केली आहे.

मी विरोधासाठी राजकारण करत नाही तर परळीच्या विकासासाठी राजकारण करत आहोत. या निवडणुकीत आपण फक्त परळीच्या विकासासाठी लढतोय. परळीतील नागरिकांचाही या लढ्याला प्रचंड प्रतिसाद मिळतोय. काही जणांना निकाल लागण्याआधीच पराभवाची भीती वाटू लागली आहे. म्हणून ही विकासाची निवडणूक पुन्हा भावनिकतेच्या मुद्यावर आणण्याचा काहींचा प्रयत्न सुरू झाला आहे. पण हा प्रयत्न व्यर्थ ठरणार हे निश्चित.

मी जे कधी बोललोच नाही त्याच्या खोट्यानाट्या क्लीप तयार करून सोशल मीडियावर व्हायरल केल्या जात आहेत. मी आजपर्यंत कोणाचेही वाईट केले नाही, कोणाचा वाईट चिंतिले नाही. माझ्या विरोधकांबाबत मी कधी अपशब्द देखील वापरला नाही. काहींनी तर मला राक्षस म्हणून हिणवलं पण मी माझे तत्व सोडले नाही. मी कालही तत्वाचे राजकारण करत होतो आजही तत्वाचे राजकारण करत आहे. मी माझ्या १५०० बहिणींचे कन्यादान केले आहे. मी कधीही कोणत्याच महिलेबाबत चुकीच्या शब्दांचा वापर करणार नाही. त्यामुळे कार्यकर्त्यांनी आणि नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये. ही विनंती असे धनंजय मुंडे यांनी आपल्या फेसबुक पेज वर केलेल्या खुलाशात म्हटले आहे.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Maharshtra vidhansabha election 2019 dhananjay munde explian about pankaja munde video facebook post nck
First published on: 20-10-2019 at 07:58 IST