महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी राज ठाकरे यांच्या सोमवारी पुणे आणि यवतमाळ येथे दोन सभा होणार आहेत. पुण्यात महात्मा फुले मंडई येथे सोमवारी सायंकाळी सहा वाजता राज ठारेंची जाहीर सभा होणार आहे. याची माहिती महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून देण्यात आली आहे.

मनसेच्या विधानसभा निवडणुकीचा प्रचार प्रारंभ पुण्यातून बुधवारी (९ ऑक्टोबर) होणार होता. त्यासाठी राज ठाकरे यांच्या सभेचे आयोजन करण्यात आले होते. मात्र मुसळधार पावसामुळे सभा रद्द करावी लागली. त्यामुळे पुन्हा सभा घेण्याचे नियोजन शहर मनसेकडून करण्यात आले आहे. कसबा विधानसभा मतदारसंघात मनसेच्या सर्व उमेदवारांच्या प्रचाराच्या निमित्ताने ही सभा होणार आहे. यावेळी उमेदवारांकडून जोरदार शक्तिप्रदर्शन होण्याची शक्यता आहे.

मुंबई, पुणे, नाशिक या शहरी भागात मनसेचे बऱ्यापैकी वर्चस्व आहे. त्यामुळे मनसेने उमेदवारी देताना ग्रामीण भागापेक्षा शहरी भागावर जास्त लक्ष केंद्रीत केले आहे. गेल्यावेळी लोकसभा निवडणुकीच्या वेळ मनसेचे उमेदवार रिंगणात उतरले नव्हते. पण राज ठाकरे यांची प्रत्येक सभा गाजली होती. भर सभेमध्ये व्हिडिओ दाखवून राज ठाकरे मोदी सरकारच्या आश्वासनांची पोलखोल करत होते.