शिवसेना आणि काँग्रेस कधीच एकत्र येणार नाहीत, तशी शक्यताही नाही, शेर कितना भी भूखा हो घास नही खाता, असे म्हणत भाजपा नेते सुधीर मुनगंटीवारांनी सत्तेच्या नव्या समीकराणाच्या चर्चेवर पडदा टाकला आहे. प्रसारमाध्यमांशी बोलताना सुधीर मुनगंटीवार यांनी महायुतीचं सरकार पुन्हा एकदा सत्ता स्थापन करणार असल्याचा विश्वास व्यक्त केला आहे.

राज्यातील विधानसभा निवडणुकीमध्ये मतदारांनी महायुतीच्या बाजूने कलं दिला आहे. आम्ही एकत्र लढलो आहोत त्यामुळे पुढील पाच वर्ष महायुतीचाच मुख्यमंत्री असेल, असे विधान सुधीर मुनगंटीवार यांनी केलं आहे. शिवसेना-राष्ट्रवादी काँग्रेस असं नवीन समीकरण होऊ शकत नाही, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला आहे.  शिवसेना आणि आमचे विचार एक आहेत त्यामुळे सत्तास्थापनेसाठी नवीन समीकरण होऊ शकत नाही.

महाराष्ट्रामध्ये १०५ जागांसह भाजपा क्रमांक एकचा पक्ष ठरला. तर ५६ जागांसह शिवसेना दुसऱ्या आणि ५४ जागांसह राष्ट्रवादी तिसऱ्या क्रमांकावर आहे. महाराष्ट्रामध्ये आता सत्ता स्थापनेच्या प्रक्रियेला आता वेग आला असून पक्षांच्या बैठका सुरू झाल्या आहेत.

महायुतीचं सरकार येणार हे निश्चित मानले जाते मात्र, शिवसेनेला अडीच वर्षांसाठी मुख्यमंत्रीपद मिळणार का? की शिवसेना कुठल्या वाटाघाटीवर भाजपाला टेकू देणार. अथवा मुख्यमंत्रीपदासाठी राज्यात सत्तेची नवी समीकरणं आखणार. हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.