महाराष्ट्रात सरकार स्थापन करण्यासाठी महाशिव आघाडीच्या (शिवसेना, राष्ट्रवादी, काँग्रेस) नेत्यांची बैठक गुरुवारी मुंबईत झाली. यानंतर त्यांनी प्रथमच संयुक्तरित्या पत्रकारपरिषद घेतली. यावेळी बैठकीत कशावर चर्चा झाली याबाबत तिन्ही पक्षांच्या नेत्यांनी माध्यमांना माहिती दिली.

शिवसेना नेते एकनाथ शिंदे म्हणाले की, महाशिवआघाडीच्या नेत्यांची बैठक आज पार पडली आहे. या बैठकीत समान कार्यक्रमावर चर्चा झाली आहे. या चर्चेतील मुद्दा तिन्ही पक्ष श्रेष्ठींकडे पाठवला जाणार आहे. यानंतर पक्ष श्रेष्ठी मसुदा अंतिम करतील. यावर निर्णय झाल्यानंतर पुढील कारवाई संदर्भातील निर्णय घेतला जाईल.

काँग्रेसचे नेते माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी सांगितले की, आमच्या पक्ष श्रेष्ठींना आमच्यापैकी काहीजणांना या बैठकीसाठी पाठवले होते. प्रत्येक पक्षाचे प्रतिनिधी किमान समान कार्यक्रमावर चर्चा करत होते. त्यानंतर आम्ही अंतिम मसुदा तयार केला आहे. हा मसुदा प्रत्येक पक्षाच्या श्रेष्ठींकडे पाठवला जाणार आहे. त्याशिवाय त्या संदर्भात काही सांगणे शक्य नाही. पक्ष श्रेष्ठींना यात काही बदल सूचवायचे असतील तर ते सुचवतील, यानंतर पुढील कार्यवाहीचा आदेश मिळेल.

तसेच, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील म्हणाले की, तिन्ही पक्षांच्या श्रेष्ठींकडे हा मसुदा पाठवण्याची व्यवस्था होणार आहे. यानंतर तिन्ही पक्षांचे श्रेष्ठी एकत्र बसून यावर योग्य तो निर्णय घेतील. लोकसभा अधिवेशन सोमवारपासून सुरू होत असल्याने यानंतर पक्ष श्रेष्ठींची भेट होणारच आहे.