उमाकांत देशपांडे

भाजप-शिवसेना युतीबाबत दोन्ही पक्षांचे नेते ठाम असले तरी जागावाटपाचा तिढा कायम आहे. तसेच पितृपक्ष सुरू झाल्याने युतीच्या घोषणेला नवरात्रीचा मुहूर्त मिळण्याची शक्यता आहे. तोपर्यंत दोन्ही पक्षांनी गाफील न राहता सर्व जागा लढविण्याची तयारी सुरू ठेवली आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे महाजनादेश यात्रेत असून, समारोपाची सभा १९ सप्टेंबरला नाशिकला होणार आहे. पक्षाध्यक्ष अमित शहा यांच्यासह वरिष्ठ नेते त्यास उपस्थित राहणार आहेत. त्यामुळे युतीबाबत चर्चेच्या पुढील फेऱ्या १९ सप्टेंबरनंतरच सुरू होतील, असे ज्येष्ठ भाजप नेत्याने सांगितले. भाजपने शिवसेनेला ११७-१२० जागा देण्याची तयारी दाखविली असून भाजप १६० जागा लढविणार आहे, तर उर्वरित जागा घटकपक्षांना दिल्या जातील. लोकसभेत घवघवीत यश मिळाल्याने आणि राज्यात भाजपची ताकद वाढल्याने भाजप आता मोठा भाऊ आहे. शिवसेनेचा जरी निम्म्या जागांचा आग्रह असला तरी तो मान्य होणे शक्य नाही, असे संबंधितांनी स्पष्ट केले.

शिवसेना गेली पाच वर्षे भाजपसोबत सत्तेत राहिल्याने आता सत्तेत कायम राहावे, असेच शिवसेनेच्या नेत्यांना वाटत आहे. जागावाटपात ताणून धरले आणि भाजपने स्वबळावर सत्ता मिळविली, तर शिवसेनेची पंचाईत होईल. त्यामुळे चर्चेच्या माध्यमातून अधिकाधिक जागा पदरात पाडून घ्यायच्या, असे शिवसेनेचे सध्याचे धोरण आहे. सत्तेत राहण्यासाठी कोणत्याही परिस्थितीत युती कायम ठेवावी, असा एक मतप्रवाह शिवसेनेत आहे.

मित्रपक्षांकडून चाचपणी

जागावाटपात दोन्ही पक्षांकडून रस्सीखेच होत असून घटकपक्षांना नेमक्या किती जागा द्यायच्या, हे अद्याप निश्चित झालेले नाही. रिपब्लिकन पक्ष, राष्ट्रीय समाज पक्ष यांनी भाजपच्या चिन्हावर निवडणूक लढविण्यास नकार दिला आहे. मात्र त्या दृष्टीने अजून चाचपणी सुरू आहे. या परिस्थितीत युतीच्या जागावाटपाचा अंतिम निर्णय घेण्यासाठी १०-१२ दिवसांचा अवधी लागणार आहे. मुख्यमंत्री फडणवीस व उद्धव ठाकरे यांच्यात चर्चा होऊन युतीचे जागावाटप अंतिम होईल. त्यामुळे त्यासाठी नवरात्रीपर्यंत वाट पाहावी लागण्याची शक्यता असल्याचे ज्येष्ठ भाजप व शिवसेना नेत्यांनी स्पष्ट केले.

बैठकांचे सत्र

दोन्ही पक्षांनी गाफील न राहता सर्व २८८ जागा लढविण्याची तयारी सुरू ठेवली आहे. इच्छुकांच्या मुलाखती, मतदान केंद्रनिहाय कार्यकर्त्यांच्या बैठका सुरू ठेवल्या आहेत. भाजप अध्यक्ष अमित शहा,

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या चर्चेत ठरल्यानुसार युतीचा निर्णय होईल, असे खासदार संजय राऊत यांनी सांगितले. ठाकरे यांनी पक्षाचे खासदार, आमदार व वरिष्ठ नेत्यांची बैठक रविवारी मातोश्री निवासस्थानी घेतली. आमच्या विभागातील जागांवर तयारी करण्याची सूचना पक्षाने दिली असल्याची माहिती खासदार हेमंत गोडसे यांनी दिली. शिवसेना आणि भाजपमध्ये विविध स्तरांवर बैठकांचे सत्र सुरू असून भाजप कार्याध्यक्ष जे. पी. नड्डा यांनीही मार्गदर्शन केले.