आगामी विधानसभेसाठी भाजपा- शिवसेना यांच्यात गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेलं जागा वाटपाच गणित अखेर सुटलं असल्याचं दिसत आहे. आता भाजपा -१४४, शिवसेना १२६ व अन्य मित्र पक्ष १८ जागांवर लढणार असल्याच जवळपास निश्चित झाल्याची माहिती समोर येत आहे. आज भाजपा अध्यक्ष अमित शाह यांच्या उपस्थितीत झालेल्या भाजपाच्या कोअर कमिटीच्या बैठकीत हे सूत्र निश्चित झालं असल्याचं बोललं जात आहे. मात्र सध्यातरी या वृत्तास कोणाकडूनही अधिकृतपणे दुजोरा दिला गेलेला नाही. भाजपाच्या कोअर कमिटीची बैठक तब्बल नऊ तास सुरू होती.

भाजपा अध्यक्ष व गृहमंत्री अमित शाह यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीस केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील आदींची प्रमुख उपस्थिती होती.

अनेक दिवसांपासून महायुतीचं जागा वाटपाचं निश्चित होत नव्हत. अखेर त्याला आज मुहूर्त लागला असल्याचं दिसत आहे. शिवाय महायुतीच्या जागा वाटपांनंतर विरोधीपक्ष देखील त्यांचे काही जागांवरील उमेदवार ठरवणार असल्याचे सांगण्यात आलेलं आहे. सध्या मिळालेल्या माहितीनुसार यंदाची विधानसभा निवडणुक भाजपा स्वबळावर नाहीतर शिवसेनेला सोबत घेऊन लढणार असल्याच निश्चित मानल जात आहे. यानुसार भाजपा १४४ तर शिवसेना १२६ जागांवर लढेल अशी माहिती आहे. याचबरोबर महायुतीचे मित्रपक्ष रिपाइं, रासप, शिवसंग्राम आणि रयत क्रांती सेनेला मिळून १८ जागा देण्यात येणार असल्याचाही निर्णय झाल्याचे समोर येत आहे. रविवारी महायुतीच्या जागा वाटपाची अधिकृत घोषणा केली जाण्याची शक्यता आहे. तसेच, शिवसेना-भाजप दरम्यान काही जागांची आदलाबदली होणार आहे.