मराठी सिनेसृष्टीतील अनेक कलाकारांनी मागील काही आठवड्यांमध्ये रस्त्यांवरील खड्ड्यांविरोधात आवाज उठवल्याचे पहायला मिळाले. आता निवडणुकीच्या काळात मराठी सिनेसृष्टीतील विनोदी अभिनेता भरत जाधवने राजकारण्यांवर टीका करणारा एक व्हिडिओ पोस्ट केला आहे. या व्हिडिओमध्ये त्याने कोणाचेही नाव न घेता, ‘शेण नक्की कोण खातंय’ असा सवाल उपस्थित केला आहे. हा व्हिडिओ मी एक सामान्य नागरिक आणि मतदार म्हणून पोस्ट करत असल्याचेही त्याने म्हटले आहे.

भरतने आपल्या फेसबुक पेजवर एक व्हिडिओ पोस्ट केला आहे. ‘भारत माझा देश आहे सारे भारतीय माझे बांधव आहेत,’ या शाळेत म्हटल्या जाणाऱ्या प्रतिज्ञेच्या ओळींने त्याने या व्हिडिओला सुरुवात केली आहे. या व्हिडिओत पुढे त्याने राज्य तसेच देशामधील अनेक प्रश्नांना जबाबदार कोण आहे असा सवाल उपस्थित केला आहे. ‘नक्की शेण खातयं कोण?’ यावर मला खूप बोलायचंय असं सांगताना भरतने अनेक उदाहरणे दिली आहेत. ‘आंतरराष्ट्रीय स्तरावर आपला देश एखादा करार करतो तेव्हा खूप आनंद होतो. आपल्या देशातील एक नेता तिकडे जाऊन करार करतो याचा खूप आनंद होतो. आपण फटाके फोडून आनंद व्यक्त करतो. या कराराची माहिती मिळते. पण या करारामुळे भलं झाल्याची उदाहरणे मिळत नाहीत. मग यामध्ये नक्की शेण खातयं कोण?,’ असा सवाल भरतने या व्हिडिओत विचारला आहे.

भारताबद्दल बोलून झाल्यावर भरतने ‘जय जय महाराष्ट्र माझा’ गात महाराष्ट्रातील विषयांना हात घातला. महाराष्ट्रातील विकासामध्ये गडबड गोंधळ होतो तेव्हा नक्की शेणं खातयं कोण हा प्रश्न पडतो असं भरत सांगतो. ‘मी पक्ष कुठला वाईट आहे असं म्हणत नाही. प्रत्येकजण आपल्या देशासाठी, महाराष्ट्रासाठी काहीतरी करावं यासाठी अभिमानाने झटत आहेत. त्यामुळे माझा राग आणि रोष हा एखाद्या पक्षाबद्दल नाहीय. पण मी जेव्हा मतदान करतो तेव्हा मला रस्त्यात खड्डेच दिसतात. रस्त्यात खड्डे की खड्ड्यात रस्ते हा विनोद करुन माझ्यासारखा विनोदी कलाकार कंटाळलाय अगदी. याचा विनोद करायाच पण त्रास होतोय आम्हाला. पाच वर्षासाठी आम्ही एखादं सरकार निवडून दिलयं तर रस्ते किमान पाच वर्ष तरी टिकावेत. दरवर्षी दिवाळी येते तसे दरवर्षी खड्डे पडतात तर नक्की शेण खातयं कोण?,’ असं भरतने या व्हिडिओमधून विचारले आहे.

‘प्रत्येकजण पक्षांतर करतोय. या पक्षातून त्या पक्षात उड्या मारताय. आम्हाला एखाद्या व्यक्तीचा त्रास होतो आणि आम्ही दुसऱ्या पक्षाला मतदान करण्याचं ठरवतो तर तो पक्ष आम्हाला त्रास होणाऱ्या व्यक्तीलाच उभं करतात. असं होत असेल तर प्रश्न पडतो की मधल्या या घडणाऱ्या गोष्टींमध्ये नक्की शेण खातयं कोण?,’ अशी टीका भरतने पक्षांतर करणाऱ्या नेत्यांचे नाव न घेता केली आहे.

‘राजकारण आणि पक्ष बाजूला ठेऊन बोलायचं झालं तर आमची अनेक मराठी पोरं आयपीएस, आयएएस अधिकारी आहेत. त्यांना शपथ दिली जाते की हा या देशाचं, महाराष्ट्राचं भलं करणार का? त्याच्यात ही शक्ती आहे का? असं असेल तरच त्याला ती शपथ दिली जाते. या सर्वांमधून ती पोरं पुढे येतात आणि त्यांना आधी जे करता येत नाही ते करायचा प्रयत्न करतात. पण या सर्वात मध्ये येत नक्की शेण खातयं कोण? म्हणत भरतने सरकारी कामात आडकाठी घालणाऱ्या नेत्यांवर टीका केली आहे.

‘आमदार, खासदार, नगरसेवक सगळेच शपथ घेतात. त्यात पहिली शपथ अशी असते की मी माझ्या देशाचं भलं करेल, मी सामान्यांच्या गरजा भागवेल. पण त्या गरजा पूर्ण होताना दिसत नाहीय. प्रत्येक ठिकाणी लोकांना टक्केवारी दिसते. मग यात शेण खातयं कोण?,’ असा प्रश्न पडत असल्याचे भरत सांगतो. व्हिडिओच्या शेवटी भरतने आता हा व्हिडिओ पोस्ट करण्यामागील भूमिका स्पष्ट केली आहे. तो म्हणतो, ‘मी आता का बोलतोय तर राजाकारण्यांमुळे मला सवय लागलीय निवडणुका आल्या की ते येतात त्यांचे मत मांडतात. तर एक मतदार म्हणून मी मत देण्याआधी माझे मत मांडत आहे. तुम्हालाही ते व्यक्त करावं वाटतयं. तुम्हालाही अनेक प्रश्न असल्याचं दिसतयं. करा मत व्यक्त. पण मत व्यक्त करताना काय बोलावं कळत नसेल तर स्वत:लाही एकदा विचारा की तुमच्या विचारात शेण खातयं कोण?’

भरतने पोस्ट केलेला हा व्हिडिओ साडेसहा हजारहून अधिक लोकांनी शेअर केला असून अनेकांनी त्याने उपस्थित केलेल्या प्रश्नांबद्दल त्याचे अभिनंदन केले आहे.