नुकतेच विधानसभा निवडणुकांचे निकाल लागले आहेत. यामध्ये भाजपा सर्वात मोठा पक्ष ठरला आहे. तर शिवसेना दुसऱ्या, राष्ट्रवादी काँग्रेस तिसऱ्या आणि काँग्रेस चौथ्या क्रमांकाचा पक्ष ठरला आहे. अशातच एक मोठी बाब समोर आली आहे. मराठी मतदारांनी म्हणजेच मराठी बहुल भागातील बहुतांश मतं ही शिवसेनेला पडल्याचं आकडेवारीवरून दिसून येत आहे.

मराठी बहुल भागांमध्ये मनसेच्या तुलनेत शिवसेनेने अधिक जोर मारल्याचं दिसून आलं आहे. मुंबईतील विधानसभेच्या १४ जागांवर शिवसेनेला विजय मिळाला आहे. भांडुप पश्चिम, मागाठणे, विक्रोळी, जोगेश्वरी पूर्व, दिंडोशी, शिवडी, वरळी, माहिम या मतदारसंघांमध्ये इतर मतदारसंघांच्या तुलनेत मराठी मतदार अधिक आहेत. यामध्ये यावेळी शिवसेनेनं बाजी मारल्याचं दिसून येत आहे. विशेष म्हणजे २००९ मध्ये पार पडलेल्या विधानसभा निवडणुकांमध्ये या मतदारसंघात मनसेनं बाजी मारली होती. परंतु यावेळी शिवसेनेसोबतच मनसेचा पर्याय उपलब्ध असतानाही मतदारांनी शिवसेनेला पसंती दिल्याचं दिसून येत आहे.

दरम्यान, १४ पैकी ज्या ठिकाणी मराठी मतदार कमी आहेत अशा ठिकाणीही शिवसेनेला अधिक मतं मिळाली आहेत. त्यामुळे एकेकाळी मनसेसोबत असणारा मराठी मतदार पुन्हा एकदा शिवसेनेच्या बाजूनं गेल्याचं दिसून येत आहे.

मतदानाची आकडेवारी
वरळी – आदित्य ठाकरे – ६७ हजार ४२७ (मनसे उमेदवार नाही)
जोगेश्वरी पूर्व – रवींद्र वायकर – ५८ हजार ७८७ (मनसे उमेदवार नाही)
मागाठणे – प्रकाश सुर्वे – ४९ हजार १४६ (दुसऱ्या क्रमांकावर मनसेचे नयन कदम ४१ हजार १५ मतं)
दिंडोशी – सुनिल प्रभू – ४४ हजार ५११ (तिसऱ्या क्रमांकावर मनसेचे अरुण सुर्वे २५ हजार ८३४ मतं)
शिवडी – अजय चौधरी – ३९ हजार ३३० (दुसऱ्या क्रमांकावर मनसेचे संतोष नलावडे ३८ हजार ३५० मतं)
भांडुप पश्चिम – रमेश कोरगांवकर – २९ हजार १७३ (दुसऱ्या क्रमांकावर मनसेचे संदीप जळगावकर)
विक्रोळी – सुनिल राऊत – २७ हजार ८४१ (तिसऱ्या क्रमांकावर मनसेचे विनोद शिंदे १६ हजार ८ मतं)
माहिम – सदा सरवणकर – ६१ हजार २२३ (दुसऱ्या क्रमांकावर मनसेचे संदीप देशपांडे ४२ हजार ६०९ मतं)