४६ मतदारसंघांपैकी १६ जागांवर भाजपचा, तर १२ जागांवर शिवसेनेचा विजय

सुहास सरदेशमुख, औरंगाबाद</strong>

दुष्काळी अशी हेटाळणीवजा ओळख असणाऱ्या आणि सत्ताधाऱ्यांकडून काहीसे दुर्लक्ष केल्या जाणाऱ्या मराठवाडय़ानेच अखेर भाजप-शिवसेना युतीला तारले असल्याचे चित्र निकालानंतर आज स्पष्ट झाले. मराठवाडय़ातील ४६ मतदारसंघांपैकी ४५ जागांचे निकाल रात्री नऊवाजेपर्यंत घोषित झाले होते. त्यानुसार १६ जागांवर भाजपला, तर १२ जागांवर शिवसेनेला विजय मिळविता आला. काँग्रेसला २०१४ च्या तुलनेत एक जागा कमी मिळाली. तर घनसावंगीचा निकाल कोणाच्या बाजूने लागतो, यावर राष्ट्रवादी अधिक की उणे हे ठरेल. कारागृहातून निवडून येणारे राष्ट्रीय समाज पक्षाचे रत्नाकर गुट्टे आणि तब्बल २५ वर्षांनंतर लोहा-कंधार मतदारसंघातून शेकापचा ‘खटारा’ श्यामसुंदर शिंदे यांच्या रुपाने विधानसभेत जाणार आहे. मराठवाडय़ाचे पाच मंत्री, त्यातील तिघांना दणदणीत पराभवाला सामोरे जावे लागले. अर्जुन खोतकर आणि पंकजा मुंडे यांच्या नेतृत्वावर भाजप आणि शिवसेनेची बरीच भिस्त होती, ती यापुढे भरून काढण्यासाठी विशेष प्रयत्न करावे लागणार आहे.

ज्या जिल्ह्य़ांच्या नावाच्या पाठीमागे ‘बाद’ असा उल्लेख आहे, त्यामुळे निर्माण होणाऱ्या धार्मिक ध्रुवीकरणाच्या मतांच्या जोरावर औरंगाबाद आणि उस्मानाबाद या दोन जिल्ह्य़ांत सेनेला आणि भाजपला अक्षरश: सर्व जागा मिळाल्या.  औरंगाबाद जिल्ह्य़ातून नऊ मतदारसंघातून सेनेला सहा जागांवर विजय मिळाला, तर उस्मानाबादमधील चारही मतदारसंघात महायुतीचे उमेदवार विजयी झाले. विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे, मंत्री बबनराव लोणीकर यांना विजय मिळाला. त्याचबरोबर बाहेरून पक्षात घेतलेल्या दोन आयारामांना यश मिळाले. सिल्लोड मतदारसंघातून अब्दुल सत्तार आणि तुळजापूर मतदारसंघातून राणाजगजितसिंह पाटील निवडून आले. या दोन जागा तशा वाढलेल्या. पूर्वी सत्तार काँग्रेसमध्ये, तर राणा जगजितसिंह राष्ट्रवादीत होते. लातूरमध्ये संधी असतानाही उमेदवारी देताना घातलेल्या घोळामुळे भाजपला केवळ दोन जागांवर समाधान मानावे लागले. काँग्रेसकडून उभे असणारे दोन सख्खे भाऊ आणि धीरज देशमुख आता विधानसभेत जाणार आहेत. राष्ट्रवादीलाही जोन जागा मिळविता आल्या. उदगीरची जागा भाजपाकडे अनेक वर्षे होती. मात्र, तेथून राष्ट्रवादीचा संजय बनसोडे विजयी झाले. जयदत्त क्षीरसागर यांचा पराभवही आयारामांना धडा शिकविणारा ठरला.

औरंगाबाद जिल्ह्य़ात आता काँग्रेस आणि राष्ट्रवादीचा आकडा शून्यावरचा आहे. तर सेनेला बीड आणि लातूरमध्ये भोपळा फोडता आला नाही. ही काही आजची अवस्था नाही. पण हिंगोलीत आता काँग्रेस नावाला उरली नाही. तेथे कळमनुरी मतदारसंघात काँग्रेसचा वरचष्मा होता. राजीव सातव तेथे नेतृत्व करायचे. राष्ट्रवादी काँग्रेसला औरंगाबाद, नांदेड, परभणी या जिल्ह्य़ात एकही जागा मिळविता आली नाही. राजकीय पटमांडणीत घातलेले घोळ एवढे अधिक असतानाही भाजपला गेल्यावेळेपेक्षा एक जागा अधिक मिळविता, तर फायद्यात मात्र सेना राहिली.

२०१९ मध्ये राष्ट्रीय समाज पक्षाला एक जागा, तर शेकापला एक जागा

चुरशीच्या लढतीत धनंजय मुंडे विजयी झाले, तर काकाला हरवून पुतण्या संदीप क्षीरसागर विजयी झाला. राणाजगजितसिंह पाटील यांच्या रुपाने तुळजापूर मतदारसंघात पहिल्यांदा कमळ फुलले. उस्मानाबाद जिल्ह्य़ात कमळाचे चिन्ह मतदारांचे चिन्ह पहिल्यांदा माहीत झाले. मधुकरराव चव्हाणांसारखा ८० वर्षांचा काँग्रेसचा नेता पराभूत झाला, तर धोतर घालणारा आणखी एक नेता अशी ओळख असणारे हरिभाऊ बागडे विजयी झाले. जयदत्त क्षीरसागरांचा पराभव आणि अतुल सावे यांना मिळालेला विजय यामुळे मराठवाडय़ातून एमआयएमला मिळणारी पाठिंब्याची कुबडी काढून घेण्यात शिवसेना-भाजपला यश आले. औरंगाबादेतून संजय शिरसाट यांचा विजयही या अंगाने महत्त्वपूर्ण मानला जातो. सेना आणि भाजपने तारल्यामुळे राज्यातील भाजपच्या आकडय़ात भर पडली आहे, हे सत्ताधारी मंडळींना यावेळी आवर्जून कळावे, अशी प्रतिक्रिया मराठवाडय़ातून व्यक्त होत आहे.

रात्री ९.३० वाजेपर्यंत घनसावंगी या मतदारसंघाचा निकाल घोषित नव्हता. त्यामुळे ही जागा राष्ट्रवादीला की सेनेला ठरू शकले नाही. वाढली तर जागा राष्ट्रवादीच्या पारडय़ात जाईल, असे उशिरा रात्री सांगितले जात होते.