13 August 2020

News Flash

युतीत असहकार कायम

वीस पंचवीस वर्षांपूर्वी शिवसेना सोडून गेलेल्या नेत्यांच्या विरोधातील असंतोष शिवसैनिकामधील आजही कायम आहे.

(संग्रहित छायाचित्र)

|| विकास महाडिक

ऐरोलीत ठाणेकरांची, तर उरणमध्ये ठाकूर गटाची प्रचाराकडे पाठ:- मातोश्रीचे आदेश आणि पालिकेतील विरोधी पक्षनेते विजय चौगुले यांच्या असहकार्यामुळे ऐरोलीत माजी मंत्री गणेश नाईक यांच्या विरोधात रणशिंग फुंकण्याचे शिवसेना नेत्यांचे प्रयत्न अयशस्वी ठरल्याने संतापलेल्या नाईकविरोधक ठाणेकर नेत्यांनी ऐरोली मतदार संघात नाईकांना ‘धडा’ शिकविण्याचा आदेश जारी केला आहे. त्यामुळे नाईक यांना ऐरोली मतदारसंघात शिवसेनेकडून दगाफटका होण्याची शक्यता आहे, तर बेलापूरात बंडखोरांच्या माध्यमातून अपशकून करण्याचा प्रयत्न आहे. उरण मतदारसंघात भाजप शिवसेनेचे उमेदवार आमदार मनोहर भोईर यांच्या प्रचारात उतरणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे.

वीस पंचवीस वर्षांपूर्वी शिवसेना सोडून गेलेल्या नेत्यांच्या विरोधातील असंतोष शिवसैनिकामधील आजही कायम आहे. त्यामुळे माजी मुख्यमंत्री नारायण राणे, उपमुख्यमंत्री छगन भुजबळ, आणि माजी मंत्री गणेश नाईक यांच्या विरोधात शिवसैनिक अधूनमधून संताप व्यक्त करीत असल्याचे चित्र आहे. शिवसेना सोडून गेलेले हे तीनही नेते नंतर आघाडी सरकारमध्ये उच्चपदापर्यंत पोहोचले. त्यामुळे शिवसैनिकांतील हा असंतोष वाढतच गेला आहे. राष्ट्रवादी सोडून नाईक कुटुंबाने भाजपमध्ये प्रवेश करण्याच्या निर्णय घेतल्यापासून शिवसैनिक सतर्क झाले होते.

लोकसभा निवडणुकीत शिवसेनेला नवी मुंबईतील या दोन मतदारसंघातून ८४ हजार मतांचे मताधिक्य आहे. त्यामुळे एक मतदारसंघ तरी शिवसेनेला हवा होता. दोन्ही मतदारसंघ सोडून नवी मुंबईतील शिवसेना संपविण्यास मातोश्रीने हातभार लावल्याची भावना शिवसैनिकांमध्ये तयार झाली आहे. अशावेळी भाजपचे उमेदवार निवडून येणार नाहीत, याची काळजी काही शिवसेना नेत्यांकडून घेतली जात आहे. त्यात नाईक हे शिवसेनेचे कट्टर विरोधक मानले जातात. त्यामुळे त्यांना धडा शिकवण्याची भाषा सेना नेत्यांची खासगीत सुरु केली आहे. ठाणेकर नेत्यांनी तर ऐरोलीत काम करण्यापेक्षा कळवा मुंब्रा मतदारसंघात काम करण्याचा

सल्ला ऐरोलीकर पदाधिकाऱ्यांना दिला आहे. त्यात दोन्ही दगडावंर पाय ठेवून महत्वाची पदे पदरात पाडणारे पालिकेचे विरोधी पक्षनेते विजय चौगुले यांनी नाईकांच्या पायावर लोटांगण घातल्याने नाईकांना धडा शिकवण्याची तयारी कमकुवत झाली आहे. चौगुले यांचा चिंचपाडा, इलटणपाडा या झोपडपट्टी भागात प्रभाव आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी चौगुले यांना वडार समन्वय समितीचे सभापती देऊन मांडलिक केले आहे. मागील महापौर निवडणूकीत शिवसेनेचे उमेदवार असलेल्या चौगुले यांनी मुख्यमंत्र्यांनी डोळे वटारताच माघार घेतली होती. तेव्हापासून चौगुले भाजपाच्या कळपात गेलेले आहेत. तरीही शिवसेनेच्या ३८ नगरसेवकांचे विरोधी पक्षनेते पद बळकावून बसल्याने ते सोयीनुसार शिवसेना व भाजपा या दोन्ही पक्षात आहेत. त्यांनी आपली ताकद पूर्वाश्रमीचे गुरु नाईक यांच्या पाठीमागे उभी करण्याचा निर्णय घेतला आहे तर या मतदार संघात बोहल्यावर चढविण्यात येणारे विजय नाहटा हे नाईकांच्या विरोधात आहेत. ठाणेकर दाढीवाले बाबांच्या आदेशाने नाईकांना धडा शिकविण्यासाठी काही पदाधिकारी तयार असून नाईकांची या मतदार संघातील लढाई हे महायुती असताना एकला चलो रे सारखीच आहे. बेलापूर मतदार संघात नेहमीच स्थानिक नेत्यांच्या मागेपुढे फिरणारे विजय माने यांनी बंडखोरी केल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. माने यांच्याशी आमचा काहीही संबध नसल्याची आरोळी येथील नेते समाजमाध्यमांवर ठोकत आहे पण माने यांचीही उमेदवारी ही भाजपाच्या बेलापूरच्या आमदार म्हात्रे यांना अपशकून करण्यासाठी असल्याचे स्पष्ट दिसून येत आहे.

शिवसेनेच्या भाजपला विनवण्या

उरण विधानसभा मतदार संघातून भाजपाचे नेते महेश बालदी यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला असून त्यामुळे महायुती मध्ये उरणची जागा शिवसेनेला मिळालेली असतांनाही भाजपाची साथ मिळत  नसल्याने भाजपा नेत्यांना शिवसेनेला मदत करावी याकरीता बुधवारी माजी खासदार रामशेठ ठाकूर यांची भेट घेऊन मदत करण्याची विनंती करण्यात आली. यावेळी मावळचे खासदार श्रीरंग बारणे,उरणचे आमदार मनोहर भोईर तसेच माजी जिल्हा प्रमूख बबन पाटील यांनी भेट घेतली. शिवसेना व भाजपाची राज्यात युती झालेली असली तरी उरण मतदार संघात भाजप विरोधात शिवसेना असे चित्र निर्माण झाले आहे. त्यामुळे युती असूनही भाजपाकडून मदत होणार नसल्याने शिवसेनेला फटका बसण्याची शक्यता असल्याने ज्येष्ठ नेते म्हणून माजी खासदार रामशेठ यांनी उरणच्या भाजपा पदाधिकाऱ्यांना व कार्यकर्त्यांना युतीचे काम करण्याची सुचना करण्याची विनंती करण्यात आली. या भेटीला रामशेठ यांनी स्वत दुजोरा दिला आहे. जसजशी निवडणूक जवळ येत आहे. तसतशी शिवसेनेला मदत व्हावी मागणी भाजपाकडे केली जातांना दिसत आहे.

‘खंजीर खुपसणाऱ्यांना जागा दाखवू’

शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी दसरा मेळाव्यात शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या पाठीत खंजीर खुपसणाऱ्यांना नेत्यांना जागा दाखविण्याचा इशारा दिला आहे. त्यानुसार शिवसैनिकांनी मतदारसंघात प्रचार रणनीती आखली आहे.

पनवेलबाबत सेनेने पूर्ण पाठिंबा देऊन आजपासून प्रचार करण्याचे ठरले. त्यानुसार यापुढे युतीचे कार्यकर्ते भाजप युतीचे उमेदवार प्रशांत ठाकूर यांना निवडून आणण्यासाठी काम करताना दिसतील. प्रशांत हेच उमेदवार असल्याने मी पनवेलमध्ये प्रचारासाठी असेन. त्यामुळे इतर मतदारसंघात वयोमानामुळे जाणे अशक्य होईल. -रामशेठ ठाकूर, माजी खासदार

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 10, 2019 1:33 am

Web Title: matoshree shiv sena ganesh naik akp 94
Next Stories
1 बेलापूरमधील पालिका रुग्णालयात पहिली प्रसूती
2 ‘विमानतळ होतेय’ची २० वर्षे पूर्ण  
3 मतदान जनजागृतीसाठी ‘भावी मतदारां’चा मेळावा
Just Now!
X