आमचं ठरलंय आमचं ठरलंय असं भाजपा आणि शिवसेना हे दोन्ही पक्ष लोकसभा निवडणुकीच्या आधीपासून सांगत आहेत. मात्र उद्या अर्थात मंगळवारी भाजपा आणि शिवसेना यांची युती जाहीर होण्याची शक्यता आहे अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांची संयुक्त पत्रकार परिषद होणार आहे. या पत्रकार परिषदेत युतीची घोषणा होण्याची शक्यता आहे. महाराष्ट्रात आमची युती होणारच असं दोन्हीकडच्या नेत्यांनी सांगितलं आहे. तरीही उद्या होणाऱ्या पत्रकार परिषदेत नेमकं काय जाहीर केलं जातं हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरु झाली आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादीने त्यांची आघाडी आणि जागावाटपाचा फॉर्म्युलाही जाहीर केला आहे. आता प्रश्न हा आहे की भाजपा आणि शिवसेना यांची युती होणार की नाही? झाली तर जागावाटप कसं होणार? मित्रपक्षांना किती जागा दिल्या जाणार? दोन्ही पक्षांच्या जागा समसमान असणार का? नेमकं काय काय घडणार याची उत्तरं उद्या होणाऱ्या संयुक्त पत्रकार परिषदेत मिळू शकतात अशी शक्यता आहे.

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपा आणि शिवसेना या दोन्ही पक्षात काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या दिग्गज नेत्यांनी प्रवेश केला. आता ही निवडणूक रंगतदार होणार यात काहीही शंका नाही. मात्र युतीचं घोडं अडलंय ते पुढे गेल्याशिवाय जागावाटप होणार नाही. असं सगळं असल्याने संयुक्त पत्रकार परिषदेत काय जाहीर होणार याकडे सगळ्या महाराष्ट्राचं लक्ष लागलं आहे. ज्या दिवशी विधानसभा निवडणूक जाहीर झाली त्याच दिवशी काही एक्झिट पोल्सनी युती झाल्यास महायुतीला 200+ जागा मिळतील असं भाकितही वर्तवलं आहे. तसंच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असोत की शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे असोत कुणीही युती होणार नाही असं भाष्य केलेलं नाही. उद्या होणाऱ्या पत्रकार परिषदेत युती होणार की नाही या प्रश्नाचं उत्तर मिळालं तर जागावाटपाचा फॉर्म्युलाही समजू शकतो अशीही माहिती सूत्रांनी दिली आहे.