|| भक्ती बिसुरे

पुण्याच्या महापौर मुक्ता टिळक कसबा विधानसभा मतदारसंघातून काँग्रेसच्या अरविंद शिंदे यांच्या विरोधात निवडणूक लढवत आहेत. मुक्ता टिळक या लोकमान्य टिळकांचा वारसा लाभलेल्या कुटुंबाच्या प्रतिनिधी तसेच विद्यमान महापौर म्हणून मतदारसंघात उत्तम संपर्क राखून आहेतच. मात्र निवडणूक आहे म्हटल्यावर प्रचार हवाच. मुक्ता टिळक यांचा पुत्र कुणाल, कन्या चैत्राली, पती शैलेश आणि भाऊ मंगेश लिमये असं संपूर्ण कुटुंबच त्यांच्या प्रचारात सक्रिय आहे.

कायद्याचं शिक्षण पूर्ण करून स्वतच्या व्यवसायात स्थिरस्थावर असलेला कुणाल सांगतो, आई महापौर आहे. शिवाय कसब्याची नगरसेवक म्हणूनही ती अनेक वर्षे स्थानिक राजकारणात सक्रिय आहे. त्यामुळे तिचं काम मतदारांपर्यंत घेऊन जाणं हे वेगळं आव्हान नाही, पण निवडणुकीच्या निमित्ताने मतदारांपर्यंत जाणं आवश्यक आहेच. सर्व वयोगटातल्या मतदारांना ती आपली उमेदवार वाटावी या दृष्टीने प्रचार करण्यावर मी लक्ष केंद्रित केलं आहे.

शहरातील नामांकित व्यक्तींच्या भेटीगाठी आणि बैठका यांचं नियोजन वडील करतात. कार्यकर्त्यांनी कोणकोणती कामं करायची आहेत, यासाठी दुसऱ्या दिवशीच्या प्रचाराची रूपरेषा ठरवणं ही माझी जबाबदारी असते, असं कुणालने सांगितलं.

माझी बहीण फॅशनविषयक वार्ताकन करत असल्याने समाजमाध्यमांतील प्रचार हे तिचं क्षेत्र आहे. माझा मामा मंगेश याच्याकडे डिजिटल प्रचारासाठी आवश्यक डिझाईन्स आणि मजकूर तयार करण्याची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. त्याचबरोबर घरोघरी जाऊन मतदारांच्या वैयक्तिक भेटी घेणे हे आम्ही सगळेच नियमितपणे करत आहोत, असंही तो म्हणाला.

कुणाल म्हणाला, भारतीय जनता पक्षाची पुण्यातील पहिली महिला महापौर, महापौर असताना आमदारकीची निवडणूक लढवणारी उमेदवार अशा अनेक गोष्टी आईबाबत पहिल्या आहेत. तिच्या राजकीय कारकिर्दीतील ही काही वैशिष्टय़े मतदारांच्या समोर आणण्याचा प्रयत्न आम्ही करत आहोत. आमच्या कुटुंबाचा सामाजिक आणि वैचारिक वारसा लक्षात ठेवून आईचा प्रचार करताना कोणत्याही प्रकारे या वारशाला धक्का लागणार नाही याची काळजी घेणं हे आम्ही प्रामुख्याने पाहात आहोत. कसबा विधानसभा मतदारसंघात सर्व वयोगटातील मतदार आहेत, हे वैशिष्टय़ लक्षात ठेवून प्रचारातही सर्वसमावेशकता आणण्याचा प्रयत्न असल्याचेही कुणाल स्पष्ट करतो.