|| विकास महाडिक

पालिकेची चार स्तरीय योजना फोल:- उत्तम आरोग्य सेवा ही शहराची एक ओळख मानली जाते. मुंबई पालिकेच्या काही रुग्णालयांतील आरोग्य सेवा घेण्यासाठी देशविदेशातून नागरिक येत असतात. नवी मुंबईतील सार्वजनिक व खासगी आरोग्य सेवेवर ही विश्वासार्हता नाही. त्यामुळे शासकीय आरोग्य सेवेत केवळ सोपस्कार केले जातात, तर खासगी रुग्णालयात उपचारांची बिले कशी वाढतील याची काळजी घेतली जाते. एखाद्या डॉक्टरांचा उपचारात चांगला हातखंडा आहे अशी ख्याती असणारा डॉक्टर नवी मुंबईत मिळणे तसे दुरापास्त आहे. त्यामुळे नाइलाजास्त येथील रुग्णालयात उपचार केले जातात पण समजदार आणि वैद्यकीय क्षेत्राबद्दल थोडीफार माहिती असलेले नागरिक हे उपचारासाठी मुंबई गाठतात असे दिसून आले आहे.

शहरातील रुग्णालयांनी उपचाराबाबत आपली विश्वासार्हता निर्माण केल्याचे दिसून येत नाही. त्याला कारणेही अनेक आहेत. नवी मुंबईत डॉक्टर हे केवळ व्यवसायासाठी आलेले आहेत. वैद्यकीय भाषेत ‘मेडिकल क्रीम ब्रेन’ डॉक्टर या शहरात थांबत नाहीत. त्यामुळे निष्णांत डॉक्टरांची पाश्र्वभूमी या शहराला नाही. नवी मुंबई शहर निर्माण होण्याअगोदर येथील बहुतांशी रहिवासी हे ठाण्यात उपचारासाठी जात होते. मोठय़ा औद्योगिक पट्टय़ामुळे ते शक्य होते. या मातीशी नाळ जुळलेले अपवादात्मकही डॉक्टर नाहीत. लाखो रुपयांचे कर्ज घेऊन डॉक्टरांनी या ठिकाणी दवाखाने अथवा रुग्णालये थाटलेली आहेत. यात काही पंचतारांकित रुग्णालये आहेत. ही रुग्णालये उपचार हा धर्म पाळण्यापेक्षा उपचार हा व्यवसाय म्हणून करीत असल्याने या उपचाराबाबत रुग्णांच्या नातेवाईकांनाही खात्री वाटत नाही.

शहरात सहाशेपेक्षा जास्त खासगी रुग्णालये असून जवळपास सर्वच रुग्णालये आपली विश्वासार्हता गमावून बसलेले आहेत. या रुग्णालयात पाऊल ठेवताना रुग्ण अनेक वेळा विचार करीत असल्याचे दिसून आले आहे. खासगी रुग्णालयांनी थाटलेल्या या व्यवसायांबरोबरच नवी मुंंबई पालिकेने निर्माण केलेली चतुर्थस्तरीय आरोग्य सेवा चांगल्या डॉक्टरांच्या अभावी फोल ठरली आहे. कोटय़वधी रुपये खर्च करून पालिकेने रुग्णालयांच्या चकचकीत इमारती बांधल्या खऱ्या, पण या इमारतीत निष्णांत डॉक्टरांची आजही वानवा आहे. रुग्णालये पूर्ण क्षमतेने आजही सुरू झालेली नाहीत. डॉक्टर आणि डॉक्टरेतर कर्मचाऱ्यांचा तुटवडा असल्याचे कारण दिले जात आहे. नेरुळ येथील रुग्णालय बांधून तर झाले; पण या रुग्णालयात रुग्णासाठी लागणारी ऑक्सिजन पुरवठा वाहिनीच टाकण्यात आली नव्हती. पालिकेच्या आरोग्य व अभियंता विभागाची ही अक्षम्य चूक आहे. त्यामुळे ही वाहिनी व वैद्यकीय फर्निचर करण्यास पुढील पाच वर्षे वाया गेली. त्यात नवी मुंबई पालिकेत तुटपुंज्या पगारामुळे नोकरी करण्यासाठी डॉक्टर पुढे येत नाहीत.

पावसाळ्याच्या दिवसांत नवी मुंबईपेक्षा शेजारच्या मानखुर्द, गोवंडी, मुंब्रा, पनवेल, उरण येथील रहिवासी वाशीतील आरोग्य सेवेचा लाभ जास्त घेताना दिसत आहेत. मध्यंतरी या रुग्णालयात औषधांचा तुटवडा निर्माण झाला होता. त्या वेळी या गरीब रुग्णांनाही आर्थिक ओढाताण करून औषधे बाहेरुन आणावी लागत होती. ती स्थिती कमीअधिक प्रमाणात आजही कायम आहे. यात अनेक तपासण्या करण्यासाठी येथील डॉक्टर बाहेरचा रस्ता दाखवितात. त्या वेळी या तपासण्यांना कट प्रॅक्टिसचा वास येतो. ऐरोली व बेलापूरच्या आमदारांनी आपल्या आमदार निधीतून काही दिवसांपूर्वी नवजात बालकांसाठी लागणाऱ्या इन्क्युबेटरचा पुरवठा केला; पण हा पुरवठा करण्यासाठी निवडणुकीचे वर्ष उजाडावे लागले. शहरातील खासगी व शासकीय आरोग्य सेवेवर वचक राहावा यासाठी दोन्ही आमदारांचे लक्ष असण्याची गरज आहे. त्यामुळे केवळ चतुर्थस्तरीय आरोग्य सेवेपेक्षा उत्तम आरोग्य सेवेची आवश्यकता आहे.

सेवा मात्र अपुरी

नवी मुंबई पालिकेने २३ नागरी आरोग्य केंद्रे, तीन माता बाल रुग्णालये आणि वाशी येथे तीनशे खाटांचे सार्वजनिक रुग्णालय जून २००३ मध्ये सुरू केले आहे. नेरुळ व ऐरोली येथे १०० खांटांची दोन रुग्णालये बांधून पाच ते सहा वर्षे खितपत पडलेली आहेत, पण ही रुग्णालये पूर्ण क्षमतेने आजही सुरू झालेली नाहीत.

निष्णात डॉक्टरांची कमतरता

नवी मुंबई पालिकेत तुटपुंज्या पगारामुळे नोकरी करण्यासाठी डॉक्टर पुढे येत नाहीत. नुकत्याच काढण्यात आलेल्या १४८ डॉक्टरांच्या जाहिरातीला कमी प्रतिसाद मिळालेला आहे. एखाद्या आयटी कंपनीतील अधिकाऱ्याला साठ-सत्तर हजार रुपये पगार मिळत असताना डॉक्टरांनाही तेवढाच पगार दिला जाणार असेल तर पालिकेची नोकरी स्वीकारणार कोण? हा खरा प्रश्न आहे. वैद्यकीय शिक्षणावर होणारा खर्च पाहता ही नोकरी पत्करण्यास आत्ताचे डॉक्टर तयार होत नाहीत. त्यात डॉक्टरकी हा सेवा धर्म असल्याचे मानणारा वर्ग कमी झाला आहे. त्यामुळे नवी मुंबई शहरातील सार्वजनिक आरोग्य सेवा दिवसेंदिवस ढासळत आहे.