देवेंद्र फडणवीस यांनी आज महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेऊन त्यांना दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या. त्याआधी शिवसेना नेते दिवाकर रावते हे देखील राज्यपालांच्या भेटीला आले होते. आधी दिवाकर रावते यांनी सदिच्छा भेट घेतली आणि त्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी राज्यपालांची भेट घेतली. दिवाळी निमित्त ही अनौपचारिक भेट होती असं सांगण्यात आलं. मात्र प्रत्यक्षात सत्तास्थापनेबाबत ही भेट असावी अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. कोणीही याबाबत अधिकृत वक्तव्य केलेलं नाही. मात्र ही चर्चा रंगली होती.

सध्या राज्यात सत्तास्थापनेच्या हालचालींना वेग आला आहे. भाजपा आणि शिवसेनेचे नेते वेगवेगळे राज्यपालांना भेटल्याने विविध चर्चा सुरु झाल्या आहेत. भाजपाला १०५ तर शिवसेनेला ५६ जागा मिळाल्या आहेत. आता सत्तास्थापनेचं नेमकं काय होणार? ते पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. शिवसेनेचा मुख्यमंत्री व्हावा ही मागणी शिवसेनेतर्फे करण्यात आली आहे. अडीच वर्षे शिवसेनेचा मुख्यमंत्री आणि अडीच वर्षे भाजपाचा मुख्यमंत्री असा फॉर्म्युला शिवसेनेने दिला आहे. यावर भाजपाने काहीही म्हणणे मांडलेले नाही.

राज्यात अशी सगळी परिस्थिती असताना शिवसेना नेते दिवाकर रावते आणि भाजपाचे देवेंद्र फडणवीस यांनी राज्यपालांची वेगवेगळी भेट घेतली. ही भेट दिवाळीनिमित्त घेतल्याचं सांगण्यात आलं असलं तरीही राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे.