अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींचा ‘फादर ऑफ नेशन’ उल्लेख करण्यावरुन पुन्हा एकदा एमआयएमचे अध्यक्ष असदुद्दीन ओवेसी यांनी टीका केली आहे. डोनाल्ड ट्रम्प यांच्यासाठी नरेंद्र मोदी राष्ट्रपिता असतील पण माझ्यासाठी महात्मा गांधी हेच राष्ट्रपिता आहेत असं असदुद्दीन ओवेसी यांनी म्हटलं आहे. तसंच तुम्ही ‘शाह’ असाल पण संविधानच बादशाह आहे असाही टोलाही यावेळी त्यांनी लगावला. औरंगाबादमध्ये सभेत ते बोलत होते.

“औरंगाबाद शहर मला प्रचंड प्रिय आहे. इतकं की मला कधी मृत्यू झाला तर औरंगाबादच्या जमिनीवर यावा,” असं त्यांनी यावेळी सांगितलं. तसंच इम्तियाज जलील यांचा विजय हा प्रत्येक मतदाराचा आणि भारताच्या संविधानाला मानणाऱ्या प्रत्येकाचा विजय आहे असंही यावेळी त्यांनी सांगितलं.

“जगाला धोका देण्यासाठी हे गांधींचं नाव घेतात. गांधीचं नाव घेऊन सत्तेचं दुकान चालवत आहेत,” असा आरोप यावेळी ओवेसी यांनी केला. “महात्मा गांधींबद्दल बोलताना यांच्या ओठांवर गांधींचं नाव असतं पण डोक्यात नथुराम गोडसे आहे,” असा टोला ओवेसी यांनी लगावला आहे. सत्ताधारी पक्ष गोडसेला आपला आदर्श मानतं असा आरोपही यावेळी त्यांनी केला.

“गोडसे गांधींच्या भारताला संपवत आहेत. गोडसेने गांधींना तीन गोळ्या मारल्या, पण हे गोडसे रोज अनेक गोळ्या मारत आहेत. भारताला गोडसेच्या विचारांमध्ये बुडवण्यासापून थांबवलं पाहिजे,” असं आवाहन यावेळी ओवेसी यांनी केलं.