निवडणुकीचे निकाल लागून तीन आठवड्यांचा कालावधी उलटला असला तरी राज्यातील सत्तास्थापनेचा तिढा अद्यापही सुटलेला नाही. त्यातच भाजपा आणि शिवसेनेतील वाद आणखी वाढला आहे. त्यातच आता शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस सरकार स्थापन करण्याती शक्यता व्यक्त होत आहे. अशातच एमआयएमचे प्रमुख असदुद्दीन ओवेसी यांनी आपण शिवसेना आणि काँग्रेसला पाठिंबा देणार नसल्याचं स्पष्ट केलं आहे.

‘धर्मनिरपेक्ष’ पक्षांच्या पराभवासाठी जे मला, माझा पक्षाला आणि आमच्या मतदारांना दोष देत होते त्यांना आता शांत होण्यासाठी एक कारण मिळालं आहे, असं ओवेसी यावेळी म्हणाले. महाराष्ट्रातील एमआयएमचे २ आमदार शिवसेना-कॉंग्रेस सरकारला पाठिंबा देणार नाहीत. त्याच संदर्भात एक पत्र राज्यपालांना पाठवण्यात येईल, असंही ते म्हणाले.

२४ ऑक्टोबर रोजी विधानसभा निवडणुकांचे निकाल हाती आले. १८ दिवसांनंतरही राज्यात अद्याप सरकार स्थापन होऊ शकलं नाही. राज्यात शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येण्याची शक्यताही वर्तवण्यात येत आहे. तसंच यापूर्वीच भाजपानं आपण सरकार स्थापन करू शकणार नसल्याचं स्पष्ट केलं आहे. विधानसभा निवडणुकीत भाजपाला १०५, शिवसेनेला ५६, राष्ट्रवादी काँग्रेसला ५४ आणि काँग्रेसला ४४ जागांवर विजय मिळाला आहे. शिवसेना भाजपानं बहुमताचा आकडा पार केला असला तर मुख्यमंत्रिपदावरून दोन्ही पक्षांमध्ये रस्सीखेच सुरू आहे. अडीच अडीच वर्षे मुख्यमंत्रिपद आणि सत्तेत समसमान वाट्याची मागणी शिवसेनेकडून करण्यात आली आहे. यामुळेच दोन्ही पक्षांमधील संबंध कमालीचे ताणले गेले आहेत.