14 November 2019

News Flash

अडीच वर्ष मुख्यमंत्रिपदाचं काही ठरलं नव्हतं : नितीन गडकरी

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याच नेतृत्वात राज्यात सरकार बनेल.

(संग्रहित छायाचित्र)

राज्यात निवडणुकांचे निकाल लागून दोन आठवड्यांपेक्षा अधिक कालावधी उलटून गेला आहे. त्यातच सत्तास्थापनेचा तिढा अद्यापही सुटलेला नाही. १०५ जागांवर विजय मिळवत भाजपा हा सर्वात मोठा पक्ष ठरला आहे. अशातच भाजपा मुख्यमंत्रिपदावर आपला दावा करत आहे. तर शिवसेना अडीच अडीच वर्षे मुख्यमंत्रिपद आणि सत्तेतील समसमान वाट्याच्या आपल्या मागणीवर ठाम आहे. यामुळे सत्तास्थापनेचा तिढा अधिकच वाढला आहे. त्यातच शुक्रवारी केंद्रीय मंत्री नितिन गडकरी यांनी मुंबईत येऊन राजकीय परिस्थितीची माहिती घेतली. यावेळी त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली राज्यात सरकार स्थापन होईल, असा विश्वास व्यक्त केला.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याच नेतृत्वात राज्यात सरकार बनेल. अडीच अडीच वर्षे मुख्यमंत्रिपदाचं वाटपाचं काहीही ठरलं नव्हतं. आवश्यकता भासल्यास आपण मध्यस्थी करण्यास तयार असल्याचं नितीन गडकरी यांनी स्पष्ट केलं. यापूर्वीही गडकरी यांनी महाराष्ट्रात लवकरच सरकार स्थापन होईल, असं म्हटलं होतं. तसंच या प्रकरणाशी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांचा कोणताही संबंध नाही. मी मुख्यमंत्री बनण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. मी दिल्लीतच राहणार आहे, असंही त्यांनी स्पष्ट केलं होतं.

आणखी वाचा- शिवसेनेकडून प्रस्ताव आल्यास सकारात्मक विचार: छगन भुजबळ

यापूर्वी संजय राऊत यांनी पत्रकार परिषद घेत भाजपा आणि शिवसेनेत कोणीही मध्यस्थी करण्याची गरज नाही, असं म्हटलं होतं. अडीच वर्षांच्या मुख्यमंत्रीपदाच्या मागणीवर उद्धव ठाकरे ठाम आहेत. जर राष्ट्रपती राजवट लागू करण्यात आली तर तर हा महाराष्ट्रावर झालेला अन्याय होईल असंही संजय राऊत यांनी स्पष्ट केलं. नितीन गडकरी शिष्टाई करणार का? असं विचारलं असता, मुख्यमंत्रिपदाचं लेखी पत्र घेऊन नितीन गडकरी येणार असतील तर माध्यमांचा निरोप मी उद्धव ठाकरेंना देतो असंही संजय राऊत यांनी म्हटलं होतं.

First Published on November 8, 2019 1:05 pm

Web Title: minister nitin gadkari on government formation maharashtra vidhan sabha election 2019 jud 87