राज्य सरकारने गड किल्ले भाडेतत्त्वावर देण्याचा निर्णय घेतला, तेव्हा मंत्रिमंडळाच्या बैठकीत शिवसेना व भारतीय जनता पक्षाचे मंत्री मूग गिळून गप्प बसलेले होते. त्यांना विधानसभा निवडणुकीत छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावे मत मागण्याचा नैतिक अधिकार नाही, अशी टीका खासदार अमोल कोल्हे यांनी केली.

राष्ट्रवादीचे उमेदवार आमदार संग्राम जगताप यांच्या प्रचार सभेत खासदार डॉ.  कोल्हे बोलत होते. या वेळी आमदार अरुण जगताप, आमदार राहुल जगताप, प्रा. माणिक विधाते, बाळासाहेब भुजबळ आदि उपस्थित होते.

खासदार कोल्हे म्हणाले, सत्तारुढ महायुती म्हणजे एक अजगर आहे. ईडी व सीबीआयची चौकशी दाखवून त्यांनी काँग्रेस व राष्ट्रवादीच्या अनेकांना गिळंकृत केले. राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांच्यावरही त्यांनी चाल केली. पण या अजगराची हवा पवार यांनी काढून घेतली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे मी अंगाला तेल लाऊ न बसलोय. समोर पहिलवान नाही, असे सांगतात. मग पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा, उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ हे आखाडा खणायला येत आहेत का? असा सवाल त्यांनी केला.

शिवसेनेच्या जाहीरनाम्यात लोकांना दहा रुपयात सकस जेवण देऊ , असे आश्वासन देण्यात आले. मग त्यांची झुणका भाकर व शिव वडय़ाचे काय झाले. गेल्या पाच वर्षांत त्यांना हे सुचले नाही का? त्या वेळी काय करत होतात, अशी टीका खासदार कोल्हे यांनी केली. नगर शहराला विकासाचा दृष्टिकोन असलेला आमदार लाभला आहे.  आमदार संग्राम जगताप यांनी नगर शहराचा विकास केला. याउलट विरोधी उमेदवाराने पंचवीस वर्षांत कधीही विकासाच्या मुद्यावर मते मागितली नाहीत. त्यामुळे जगताप यांच्यामागेच नगरकर उभे राहतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

आ. संग्राम जगताप म्हणाले,की निवडणूक काळात विकासाच्या मुद्यावर नगरची निवडणूक विरोधक लढवत नाही. ते वेगळेच मुद्दे आणतात. मात्र लोकांना सर्व समजले आहे. शहराच्या विकास कामात कोण आडकाठी आणतो, हेदेखील लोकांना माहिती असल्याचे त्यांनी सांगितले.

या वेळी अरविंद शिंदे, दीपक सूळ, उबेद शेख, निखिल वारे, अविनाश घुले आदींची भाषणे झाली.