12 November 2019

News Flash

किरकोळ हाणामारीचे प्रकार वगळता औरंगाबादेत ६२ टक्के मतदान

औरंगाबाद जिल्ह्य़ातील नऊ मतदारसंघात सायंकाळी पाच वाजेपर्यंत ५८.६४ टक्के मतदान झाले.

औरंगाबाद जिल्ह्य़ातील नऊ मतदारसंघात सायंकाळी पाच वाजेपर्यंत ५८.६४ टक्के मतदान झाले. दुपारी तीननंतर मतदारांच्या रांगा मतदान केंद्रांवर दिसून आल्या. तत्पूर्वी अनेक मतदान केंद्रात दुपारच्या वेळी शुकशुकाट होता. सकाळी मळभ दाटून आल्यासारखे वातावरण होते. त्यामुळे त्याचा मतदानावर परिणाम होईल, अशी शक्यता वाटत होती. काही ठिकाणी भुरभुर पाऊसही झाला. पण नंतर मतदान वाढत गेले. सकाळी नऊ वाजेपर्यंत ६.७१ टक्के मतदान झाले होते. तीननंतर लागलेल्या मतदारांच्या रांगांमुळे शहरातील काही मतदान केंद्रांवर उशिरापर्यंत मतदान सुरू राहील, अशी स्थिती होती. परिणामी मताची टक्केवारी ६० ते ६२ टक्क्य़ांपर्यंत जाईल. ग्रामीण भागात मात्र मतदानाची टक्केवारी अधिक होती. सर्वाधिक मतदान सिल्लोड तालुक्यात नोंदले गेले.

फुलंब्री या एकमेव मतदारसंघात काँग्रेसचे उमेदवार डॉ. कल्याण काळे  रिंगणात होते. अन्य मतदारसंघात भाजप-सेना आणि एमआयएमच्या उमेदवारांमध्ये चुरशीची लढत असल्यामुळे आज सकाळपासून कार्यकर्त्यांची लगबग सुरू होती. रिक्षांमधून मतदारांना आणण्यासाठीही कार्यकर्ते प्रयत्नशील होते. दुपारनंतर काही मतदान केंद्रांवर जथ्थेच्या जथ्थे मतदानासाठी येत असल्याचे दिसून आले. शहरातील आयटीआय इमारतीतील मतदान केंद्रात हे दृश्य दिसून आले. वृद्ध आणि रुग्णही मतदानामध्ये सहभागी झाले होते. बहुतांश मतदान केंद्रांवर दुपारी मतदानाला वेग आला. शहरातील काही भागात कार्यकर्त्यांमध्ये बाचाबाचीही झाली. तर बजाजनगरमध्ये पक्षाशी एकनिष्ठ नसल्याचे कारण देत रवी काळे नावाच्या व्यक्तीने मोबाईल दुकानावर दगडफेक केली. पोलिसांनी या कार्यकर्त्यांस अटक केली. सायंकाळी चंपा चौक भागात तणाव निर्माण झाला होता. या काही घटना वगळता औरंगाबाद जिल्ह्य़ातील मतदान शांततेत पार पडले. सकाळी राज्यमंत्री अतुल सावे, शिवसेनेचे नेते चंद्रकांत खैरे, प्रदीप जैस्वाल, संजय शिरसाट तसेच  खासदार इम्तियाज जलील यांनीही कुटुंबीयांसह मतदान केले. दुपारनंतर ही सगळी नेतमंडळी प्रत्येक मतदान केंद्रांवर भेटी देत होती. कोणत्या मतदान केंद्रांवर कोण कार्यकर्ता, मतदान किती झाले, ते कोणाच्या बाजूने झुकले आहे याची चर्चा सुरू झाली होती. मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी जुने आणि नवे शहर असे म्हणत तिकडे वाढले, इकडेही वाढवा असे सांगण्यात येत होते. औरंगाबाद पश्चिम मतदारसंघात ‘शिलाई मशीन’चे काय सुरू आहे याची चर्चा शिवसेनेमध्ये होती. शिलाई मशीन हे भाजप बंडखोर उमेदवाराचे चिन्ह होते. शिवसेनेच्या नेत्यांना अन्य दोन मतदारसंघात पश्चिमचे काय, असा प्रश्न विचारला जात होता. दुपारनंतर काही कार्यकर्त्यांनी अक्षरश: ‘पतंग’ उडवले. पतंग हे एमआयएमचे चिन्ह आहे.

मतदानादरम्यान काही ठिकाणी यंत्र बिघडल्यामुळे मतदान थांबवावे लागले होते. सिडकोतील फुले चौकातील मतदान केंद्रावर असा प्रकार घडल्याचे दिसून आले. नंतर मतदान सुरळीतपणे पार पडले.

सायंकाळी पाच वाजेपर्यंत औरंगाबाद जिल्ह्य़ातील नऊ मतदारसंघातील मतदानाची टक्केवारी पुढीलप्रमाणे : सिल्लोड-६७.१२, कन्नड-६२.८९, फुलंब्री-६३.६७, औरंगाबाद मध्य-५४.०१, औरंगाबाद पश्चिम-५३.०४, औरंगाबाद पूर्व-५४.७५, पैठण-६५.२३, गंगापूर-५४.२६, वैजापूर-५३.०५. सायंकाळी सहापर्यंत रांगा लागल्याने मतदानाचे हे प्रमाण सरासरी ६५ टक्क्य़ांपर्यंत जाईल, असे सांगण्यात येत आहे.

First Published on October 22, 2019 3:07 am

Web Title: minor fight vidhan sabha election akp 94