मुंबई : वांद्रे (पूर्व), कुर्ला, चांदिवली पट्टय़ात मतदानाची टक्केवारी गेल्या विधानसभा व लोकसभा निवडणुकीच्या तुलनेत कमी झाली असली तरी मुस्लीम धर्मीयांचे मतदानाचे प्रमाण चांगले होते. कुर्ला येथे न्यू मिल मैदान, राजे शिवछत्रपती मनोरंजन मैदान, ऑकिड इंटरनॅशनल स्कूल आदी मतदार केंद्रांच्या परिसरातील पक्षांच्या टेबलांवर शिवसेनेच्या बरोबरीने मनसेचे कार्यकर्ते दिसून आले व मतदार यादीतील नाव शोधण्यासाठी मतदारांची गर्दी तेथे आढळून आली.

काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसच्या टेबलांवर कार्यकर्त्यांची संख्या तुलनेने कमी होती. मतदानासाठी निरुत्साह असला तरी दुपारनंतर काही केंद्रांवर मतदानासाठी वर्दळ दिसून आली. पण सकाळपासून अनेक मतदान केंद्र परिसरातील राजकीय पक्षांच्या टेबलांवर मतदार फारसे फिरकतही नव्हते व हे कार्यकर्ते बसून होते. अनेक मतदारांना मतदान चिठ्ठय़ा मिळाल्याने किंवा मतदार यादीतील नाव ऑनलाइन शोधून ठेवल्याने मतदारांना फारशी अडचण भासली नाही. वांद्रे (प) मतदारसंघातही मतदानासाठी कमालीचा निरुत्साह दिसून आला. लोकसभा निवडणुकीच्या तुलनेत सेलिब्रिटींचीही मतदानासाठीची हजेरी ठळकपणे दिसून आली नाही. कलानगर येथील नवजीवन विद्यालयातील केंद्रावर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मतदान केले, केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनीही तेथे मतदान केले. काही भागात मनसेच्या कार्यकर्त्यांचा वावर, मतदान केंद्रांजवळ उभारल्या गेलेल्या टेबलांवर कार्यकर्त्यांची उपस्थिती याचा फटका भाजपपेक्षा शिवसेनेला अधिक बसण्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.

पावसामुळे चिखल

कुर्ला येथील राजे शिवछत्रपती मनोरंजन मैदानात पावसाने चिखल झाला होता. मैदानातच मंडप उभारून त्यावर प्लास्टिक कागद आच्छादून मतदान केंद्र उभारण्यात आले होते. मैदानातील चिखलामुळे लाकडी फळ्या टाकून मतदार व कर्मचाऱ्यांना ये-जा करण्याची सोय करण्यात आली.