News Flash

अमरावती जिल्ह्याच्या राजकारणाचा लंबक सत्तेकडे

शेतातील पेरणी ते कापणीपर्यंतची कामे रोजगार हमी योजनेअंतर्गत करण्याची प्रहार जनशक्तीची मागणी आहे.

 प्रहार जनशक्ती पक्षाचे नेते आमदार बच्चू कडू आणि आमदार राजकुमार पटेल यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची ‘मातोश्री’वर भेट घेऊन शिवसेनेला आपला पाठिंबा दिला

अमरावती : प्रहार जनशक्ती पक्षाचे नेते आमदार बच्चू कडू आणि आमदार राजकुमार पटेल यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची ‘मातोश्री’वर भेट घेऊन शिवसेनेला आपला पाठिंबा दिल्याने जिल्ह्यातील राजकारणाला पुन्हा एकदा वेगळे वळण प्राप्त झाले आहे. यात जिल्ह्याच्या राजकारणाचा लंबक विकासाच्या राजकारणाकडे नेण्याचा प्रयत्न असल्याचे सांगण्यात येत असले, तरी त्यामुळे वेगळी समीकरणेही तयार होणार आहेत.

शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली आमदार बचू कडू आणि आमदार राजकुमार पटेल यांनी शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. यावेळी अचलपूरचे आमदार बच्चू कडू आणि मेळघाटचे आमदार राजकुमार पटेल यांनी आपल्या पाठिंब्याचे पत्र उद्धव ठाकरे यांना दिले आहे. अचलपूर आणि मेळघाट या मतदारसंघात अनेक महत्त्वाचे प्रश्न प्रलंबित आहेत. या प्रश्नांची सोडवणूक करणे अत्यंत आवश्यक असल्याचे बच्चू कडू यांनी म्हटले आहे. शेतातील पेरणी ते कापणीपर्यंतची कामे रोजगार हमी योजनेअंतर्गत करण्याची प्रहार जनशक्तीची मागणी आहे. त्याचप्रमाणे दिव्यांग आणि आदिवासी बांधवांच्या योजनांची अंमलबजावणी करण्याचाही प्रहार जनशक्तीचा आग्रह आहे. अचलपूर व मेळघाट मतदारसंघातील प्रलंबित प्रश्न सोडवण्यावरही प्रहार जनशक्तीने भर दिलेला आहे. याच मुद्यांवर प्रहार जनशक्तीने शिवसेनेला पाठिंबा दिला असल्याचे बच्चू कडू यांनी सांगितले. सर्वसामान्य नागरिकांच्या, आदिवासींच्या, शेतकऱ्यांच्या, मजुरांच्या, दिव्यांग बांधवांच्या प्रश्नांवर प्रहार आणि शिवसेनेची वैचारिक भूमिका समान असल्यानेच आपण शिवसेनेला पाठिंबा देत असल्याचे बच्चू कडू यांनी म्हटले आहे. त्यामुळे दबावाच्या राजकारणात शिवसेनेचे सामर्थ्य आता वाढले आहे.

बच्चू कडू हे सलग चौथ्यांदा विधानसभेवर निवडून गेले आहेत. अचलपूर मतदारसंघातून त्यांनी काँग्रेसचे अनिरुद्ध ऊर्फ बबलू देशमुख आणि शिवसेनेच्या अचलपूरच्या नगराध्यक्ष सुनीता फिस्के यांचा पराभव केला. प्रत्येक गावात आमचा एक कार्यकर्ता सहा जणांच्या विरोधात लढला. जातीपातीच्या पलीकडे जाऊन तो लढला. या मतदारसंघात जातीधर्माचा विषय ताकदीने आणला गेला, पैशांचा वापर खूप झाला. पण आमचा झेंडा हा मतदार संघाच्या विकासासाठी आणि सामान्याच्या विकासाचा आहे. आमच्याकडे कोणत्याच धर्माचा झेंडा नव्हता. तरीही हे यश मिळाल्याचे बच्चू कडू यांनी म्हटले आहे.

प्रहार जनशक्ती पक्ष संपूर्ण ताकदीने शिवसेनेच्या सोबत राहणार असल्याची ग्वाही कडू यांच्याकडून देण्यात आली आहे. दुसरीकडे, बडनेराचे आमदार रवि राणा यांनी भाजपला पाठिंबा दिला आहे. जिल्ह्यात काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीला चांगले यश मिळाले होते. काँग्रेसला अमरावती, तिवसा, दर्यापूर या तीन ठिकाणी विजय मिळाला. मोर्शीतून स्वाभिमानी पक्षाचे देवेंद्र भुयार तर बडनेरातून रवि राणा हे आघाडी समर्थित उमेदवार निवडून आले होते. त्यापैकी रवि राणा हे भाजपकडे गेल्याने काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीचे जिल्ह्यात चारच सदस्य राहिले आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 29, 2019 4:32 am

Web Title: mla bacchu kadu rajkumar patel extended support to shiv sena zws 70
Next Stories
1 मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन जोरगेवारांनी भाजपला पाठिंबा देण्याचे संकेत दिले
2 महावितरणमध्ये मागासवर्गीयांना पदोन्नतीमध्ये डावलले!
3 शेतकऱ्यांच्या नुकसानीचे पंचनामे करून तातडीने अहवाल सादर करा
Just Now!
X