आरेमधली कारशेड कुलाब्याला का हलवण्यात आली नाही? आरेच्या जमिनीला तुम्ही का हात लावता आहात? कुलाबा येथे असलेली बॉम्बे पोर्ट ट्रस्टची जमीन तुम्हाला कुणाच्या घशात घालयची आहे? असा प्रश्न विचारत आरेमधील वृक्षतोडीवरुनही मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सरकारवर निशाणा साधला. कुलाबा येथून मेट्रो सुरु होते आहे तिथेच कारशेड बनवली असती तर काय बिघडलं असतं? असाही प्रश्न राज यांनी विचारला. या सरकारने निसर्ग पोखरला आहे असं म्हणत राज ठाकरे यांनी आरे कारशेडच्या मुद्द्यावरुन सरकारवर घणाघाती टीका केली.

एका रात्रीतून वृक्ष तोड करण्यात आली, त्यानंतर शिवसेनेचे पक्ष प्रमुख काय सांगत आहेत आमच्या हाती सत्ता दिली की आम्ही आरेला जंगल घोषित करु अरे आहेत कुठे झाडं? शुक्रवारी रात्री कोर्टाने निर्णय दिला. शनिवार रविवार कोर्टाला सुट्टी होती. त्या कालावधीत सगळी झाडं छाटून टाकली असाही आरोप राज ठाकरेंनी केला. तसेच या सरकारने निसर्ग पोखरला आहे ओरबाडला आहे असाही आरोप राज ठाकरेंनी केला.

आणखी वाचा- माझ्या हाती विरोधी पक्षाची धुरा द्या : राज ठाकरे

संपूर्ण जगभरात बिबळ्यांची सर्वाधिक संख्या असलेली जागा म्हणजे आपलं बोरीवली येथे असलेलं नॅशनल पार्क आहेत. संपूर्ण जगात सर्वाधिक बिबळे या ठिकाणी आहेत. एखाद्या शहरात राष्ट्रीय उद्यानासाठी एवढी मोठी जागा मिळत नाही. मुंबईच्या सुदैवाने ती मुंबईला मिळाली आहे मात्र आमचं सरकार ती जागा खातं आहे, पोखरतं आहे अशी टीका राज ठाकरे यांनी केली. लोक म्हणतात की आमच्या घरात बिबळ्या आला, तो तुमच्या घरात नाही आला तुम्ही त्याच्या वस्तीत राहायला गेलात. शहरावर किती ताण वाढतो आहे ते बघायचंच नाही असं या सरकारचं धोरण आहे. त्यामुळे या अशा वस्त्या वाढतात. कोण येतं? कुठे जातं? कुठे राहतं? याकडे कुणाचं लक्षच नाही असाही आरोप राज ठाकरेंनी केला. सगळा ताण पडतो तो पोलिसांवर, त्यांना शिव्या दिल्या जातात. हे चुकीचं घडतं आहे हे लक्षात घ्या असंही राज ठाकरेंनी म्हटलं आहे.

न्यायालयाने आदेश दिला की एका रात्रीत २७०० झाडं कापली गेली. न्यायालय आणि सरकार यांचं संगनमनत आहे असाही आरोप राज ठाकरेंनी केला. बाहेरुन आलेले अनेक लोक इथे येऊन राहतात, मीरा भाईंदरमध्ये नायजेरियन कुठून आले असाही प्रश्न राज ठाकरेंनी विचारला.