पृथ्वीराज चव्हाण यांचा राज्य कारभारच वांझोटा होता असं म्हणत राज ठाकरेंनी त्यांच्यावर टीकास्त्र सोडलं. डोंबिवलीतल्या सभेत राज ठाकरे बोलत होते. पूर्वी सिनेमात राजशेखर नावाचे खलनायक काम करायचे त्यांच्याप्रमाणेच पृथ्वीराज चव्हाण दिसतात. त्यांनी मुख्यमंत्रीपदी असताना जो काही कारभार केला तो वांझोटा होता. त्या कारभाराचा ना त्यांच्या पक्षाला उपयोग झाला ना इतर कुणाला उपयोग झाला ना राज्याला उपयोग असं म्हणत राज ठाकरेंनी पृथ्वीराज चव्हाण यांच्यावर घणाघाती टीका केली.

जेव्हा पृथ्वीराज चव्हाण आले तेव्हाच मी बोललो होतो की हे मराठी सिनेमातल्या व्हिलनसारखे दिसतात असं म्हणत पृथ्वीराज चव्हाण यांची खिल्लीही राज ठाकरेंनी उडवली. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची डोंबिवली या ठिकाणी सभा होती. त्या सभेत राज ठाकरेंनी पृथ्वीराज चव्हाण यांच्या राज्य कारभाराची खिल्ली उडवली.

इतकंच नाही सध्या जे मुख्यमंत्री आहेत म्हणजेच देवेंद्र फडणवीस हा भला माणूस आहे, मात्र ते खोटं बोलत असतात असा आरोप राज ठाकरेंनी केला. इतकंच नाही तर त्यासाठी त्यांनी देवेंद्र फडणवीस यांच्या सव्वा लाख विहिरी बांधल्या या वक्तव्याची आठवण करुन दिली. मुख्यमंत्र्यांनी बहुदा महाराष्ट्रातले खड्डे मोजले असावेत असा टोलाही राज ठाकरेंनी लगावला. इतकंच नाही तर माझ्या हाती जेव्हा नाशिक महापालिकेची सत्ता होती तेव्हा मी खड्डेमुक्त नाशिक करुन दाखवलं. मात्र या सत्ताधाऱ्यांना खड्डेमुक्त महाराष्ट्र करता येत नाही असंही राज ठाकरे म्हणाले.

महाराष्ट्राने महायुतीला बहुमत दिलं आहे तर खोटं का बोलता? असा प्रश्न राज ठाकरेंनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विचारला. एवढंच नाहीतर खड्ड्यांमुळे किती बळी गेले याचीही एक यादीच राज ठाकरेंनी भाषणात वाचून दाखवली. तसेच या मृत्यूंना जबाबदार कोण? असाही प्रश्न विचारला. या सरकारवर अंकुश ठेवायचा असेल तर मनसेला एक सक्षम विरोधी पक्ष म्हणून निवडून द्या असं आवाहन राज ठाकरेंनी भाषणात केलं.