सध्या राज्यात विधानसभा निवडणुकांची रणधुमाळी सुरू असून आता प्रचारही हळूहळू अखेरच्या टप्प्यात आला आहे, अखेरच्या टप्प्यात सर्वच पक्षांच्या नेत्यांनी आता आक्रमक भूमिका स्वीकारण्यास सुरूवात केली आहे. मनसे प्रमुख राज ठाकरे यांची पहिली सभा सोमवारी पुण्यात पार पडली. त्यावेळी त्यांनी भाजपा आणि शिवसेनेवर आपली तोफ डागली. त्यांशी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावरही निशाणा साधला. भाजपाने शिवसेनेला शिल्लक ठेवलं नाही. नाशिक, पुण्यासारख्या मोठ्या शहरांमध्येही शिवसेनेला एकही जागा देण्यात आली नाही. कुठून येते ही हतबलता? असा सवाल त्यांनी यावेळी केला. तसंच यावेळी जर शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे असते तर असं वागायची भाजपाची हिंमतही झाली नसती. मी जरी असतो तरी त्यांची असं वागायची हिंमत झाली नसती असं म्हणत त्यांनी शिवसेनेवर निशाणा साधला.

पावसामुळे राज ठाकरे यांची पुण्यातील पहिली सभा रद्द करण्यात आली होती. त्यानंतर सोमवारी त्यांनी पुण्यात पहिली सभा पार पडली. यावेळी त्यांनी शिवसेना भाजपावर सडकून टीका केली. दरम्यान, या भाषणामध्ये राज यांनी चंद्रकांत पाटील यांच्यावरही निशाणा साधला. ‘या निवडणुकीत आमचा अजय ‘चंपा’ची चंपी करणार. कोल्हापूर सांगली या दोन शहरांमध्ये पूर आला आणि सरकारमधला मंत्री वाहून कोथरुडमध्ये आला’ असा टोला राज यांनी लगावला. ‘चंपा’ हे नाव पुणेकरांनी चंद्रकांत पाटील यांना ठेवलं हे कळल्यावर पुणेकर नावं ठेवण्यात पटाईत आहेत, असं मिश्किल वक्तव्य राज यांनी केलं.

भाजपाकडून रोज अपमान होतो आहे तरीही शिवसेना भाजपासोबतच आहे अशी टीका मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पुण्यातल्या सभेत केली. शिवसेना पुण्यात आहे का हो? असाही खोचक प्रश्न राज ठाकरे यांनी विचारला. जर आज बाळासाहेब ठाकरे असते तर असं वागण्याची कुणाचीही हिंमत झाली नसती असंही ते म्हणाले. युती होण्यापूर्वीची जरा भाषणं आठवून बघा. ही युती पंचवीस वर्षे सडली असं उद्धव ठाकरे म्हणाले होते. मग ही युती १२४ वर का अडली? असाही प्रश्न राज ठाकरे यांनी विचारला. तसंच पुण्यातल्या भाषणात जेव्हा राज ठाकरेंनी शिवसेनेचा उल्लेख केला तेव्हा उपस्थितांनी ‘लाचार सेना’ अशीही घोषणाबाजी केली. त्या घोषणेबाबत बोलताना राज ठाकरे म्हणाले पुण्यात शिवसेना आहे का हो? हा प्रश्न विचारताच उपस्थितांमध्ये एकच हशा पिकला.