विरोधी पक्षनेतेच भाजपात गेले, तुमचे प्रश्न मांडणार कोण? मग तुमचे प्रश्न, तुमचा राग, तुमची खदखद सरकारसमोर मांडणार कोण? असे प्रश्न विचारत राज ठाकरेंनी सरकारवर निशाणा साधला. भाजपा आणि शिवसेनेच्या सत्तेत समाधानी माणूस आहे कुठे? हा प्रश्न राज ठाकरेंनी विचारला. PMC बँक भाजपाच्या माणसांनीच बुडवली. लोकांना पैसे देऊ शकत नाहीत. शेतकरी रडतो आहे, महिला, कामगार यांचे प्रश्न निर्माण झाले आहेत. बेरोजगारांना नोकऱ्या नाहीत. निवडणुकीच्या वेळी यायचं तुमच्या चेहऱ्यावर जाहीरनामे, वचननामे चिटकवायचे. निवडणूक झाली की तुम्हाला विसरुन जायचं हेच चाललं आहे.

आणखी वाचा- निसर्गसंपन्न राष्ट्रीय उद्यानाची जागा सरकार पोखरतंय : राज ठाकरे

मुंबईतल्या सांताक्रूझ भागात राज ठाकरेंची पहिली सभा सुरु आहे . राज ठाकरे यांची पहिली सभा पुण्यात होणार होती पण ती पावसामुळे रद्द झाली. मात्र मुंबईतल्या सांताक्रूझ भागात राज ठाकरेंची पहिली सभा पार पडते आहे. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरेंनी सरकार, प्रशासन यांच्यावर घणाघाती टीका केली.  सगळ्या शहरांचा विचका होतो आहे हे सांगताना राज ठाकरे यांनी खड्ड्यांचं उदाहरण दिलं. पुण्यातल्या पावासाने शहराची दाणादाण कशी उडवली याची उदाहरण दिलं.