28 September 2020

News Flash

कल्याण ग्रामीणमध्ये आघाडी-मनसे साथसाथ

ठाणे जिल्ह्य़ातील विधानसभेच्या १८ जागांपैकी सर्वाधिक चुरस कल्याण ग्रामीण मतदारसंघात पाहायला मिळेल असा अंदाज आतापासूनच बांधला जात आहे.

संग्रहित

|| जयेश सामंत

काँग्रेस-राष्ट्रवादीकडून कुणीही उमेदवार नाही:- कल्याण ग्रामीण विधानसभा मतदारसंघात शिवसेनेच्या उमेदवारीवरून पक्षात जोरदार खेचाखेच सुरू असताना काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने या मतदारसंघात अगदी उघडपणे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची साथ करण्याचा निर्णय घेतल्याने राजकीय वर्तुळात अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. आघाडीच्या जागा वाटपात हा मतदारसंघ राष्ट्रवादीच्या वाटय़ाला आला आहे. मात्र, या ठिकाणी पक्षाने कुणालाही उमेदवारी दिलेली नाही. या ठिकाणी शिवसेनेत सुरू असलेल्या सुंदोपसुंदीचा फायदा मनसेचे उमेदवार राजू पाटील यांना मिळावा यासाठी ही रणनीती आखण्यात आल्याची चर्चा आहे.

ठाणे जिल्ह्य़ातील विधानसभेच्या १८ जागांपैकी सर्वाधिक चुरस कल्याण ग्रामीण मतदारसंघात पाहायला मिळेल असा अंदाज आतापासूनच बांधला जात आहे. या ठिकाणी शिवसेनेचे विद्यमान आमदार सुभाष भोईर यांना ‘मातोश्री’वरून एबी फॉर्म देण्यात आला. मात्र त्यानंतर शिवसेनेत या उमेदवारीवरून विरोधाचे सूर उमटू लागले. पालकमंत्री एकनाथ शिंदे यांचे पुत्र आणि कल्याणचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे हे भोईर यांच्या कामगिरीवर समाधानी नसल्याची अनेक दिवसांपासून चर्चा आहे. शिंदे यांच्या कट्टर समर्थकांनी भोईर यांच्या उमेदवारीवर आक्षेप घेत काम करणार नाही, असा सूर लावला.  डोंबिवली भागातील शिवसेनेचे ज्येष्ठ नगरसेवक रमेश सुकऱ्या म्हात्रे यांना उमेदवारी मिळावी यासाठी शिवसेनेच्या एका मोठय़ा गटाने आग्रह धरला. त्यामुळे रमेश म्हात्रे यांना पक्षाची अधिकृत उमेदवारी देण्यात आली.

आघाडीचा पाठिंबा

पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या घोषणेनंतरही ग्रामीणचे विद्यमान आमदार सुभाष भोईर माघार घेण्यास तयार नाहीत. दिव्यातील नगरसेवकांचा एक मोठा गट त्यांच्याही सोबत आहे. त्यामुळे बुधवारी भोईर यांनीही शक्तिप्रदर्शन करत समर्थकांची बैठक घेतली. शिवसेनेतील ही खेचाखेची टोकाला पोहोचल्याचे लक्षात येताच राष्ट्रवादीने या मतदारसंघात ऐनवेळेस उमेदवारच द्यायचा नाही असा निर्णय घेत मनसेला उघड मदत करण्याचा निर्णय घेतला आहे.

ठाणे शहरातील बोलणी फिस्कटली?

ठाणे शहर विधानसभा मतदारसंघात विद्यमान आमदार संजय केळकर यांच्या विरोधात मनसेने अविनाश जाधव यांना उमेदवारी दिली आहे. येथेही काँग्रेस आघाडीने मनसेला साथ द्यावी, असा प्रस्ताव ‘कृष्णकुंज’वरून मांडला गेल्याची चर्चा आहे. कळवा-मुंब्य्राचे आमदार जितेंद्र आव्हाड हेदेखील यास सकारात्मक होते असे बोलले जाते. मात्र, ठाण्यातील पक्षाचे ज्येष्ठ नगरसेवक नजीब मुल्ला आणि शहराध्यक्ष आनंद परांजपे यांनी हा प्रस्ताव नाकारत निवडणूक लढवण्याचा निर्णय जाहीर केला. त्यानुसार राबोडी भागातील पक्षाचे नगरसेवक सुहास देसाई यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे.

                                                             

(कळते समजते..‘वागळे’चा साप कुणाला हिताचा!)

पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी मोठे शक्तिप्रदर्शन करत तासभर काढलेल्या रॅलीनंतर कोपरी-पाचापाखाडी विधानसभा मतदारसंघासाठी आपला उमेदवारी अर्ज शुक्रवारी दाखल केला. शिंदे हे पक्षाचे जिल्ह्य़ातील बडे नेते असल्याने त्यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी जिल्ह्य़ातील कानाकोपऱ्यातून समर्थक शहरात दाखल झाले होते. मोठय़ा शक्तिप्रदर्शनानंतर कुटुंबीय आणि काही मोजक्या कार्यकर्त्यांसह एकनाथ शिंदे वागळे इस्टेट येथील निवडणूक विभागाच्या कार्यालयात गेले, तर इतर मोजके कार्यकर्ते कार्यालयाच्या बाहेर थांबले. या दरम्यान निवडणूक विभाग कार्यालयाच्या बाहेरील आवारात एक मोठय़ा सापाचे दर्शन उपस्थितांना झाले. साहेबांच्या नावाने जयघोष करत आवारात उभे असलेल्या कार्यकर्त्यांचे लक्ष या सापाकडे गेले आणि त्याचे छायाचित्र काढण्यास त्यापैकी काही सरसावले. कार्यकर्त्यांच्या कलकलाटाने साप निघून गेला. मात्र कार्यकर्तेही उत्साही. साहेबांच्या प्रेमाचे भरते आलेल्या शिवसैनिकांनी नागाचे दर्शन साहेबांसाठी शुभशकून घेऊन आल्याची चर्चा सुरू केली. ही चर्चा बघता बघता वेगाने मिरवणुकीत सामील झालेल्या कार्यकर्त्यांमध्ये पोहचली आणि प्रत्येक जण सापाचे दर्शन घेण्यासाठी कार्यालयाच्या आवारात गर्दी करू लागला. एकनाथ शिंदे उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी निवडणूक कार्यालयात गेले असता त्या ठिकाणी काँग्रेसचे उमेदवार संजय घाडीगावकर, मनसेचे महेश कदम हे उपस्थित होते. त्यामुळे शिंदे यांच्या प्रतिस्पर्धी उमेदवारांच्या कार्यकर्त्यांनी ‘वागळे’चा हा साप आम्हालाच शुभशकून देणारा असेल, असे प्रतिउत्तर देण्यास सुरुवात केली. काही उत्साही कार्यकर्ते तर साहेब उपमुख्यमंत्री होणार आणि ‘वागळे’चा साप त्याचीच वर्दी घेऊन आला होता, अशीही चर्चा करू लागले.

– ऋषीकेश मुळे

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 5, 2019 4:53 am

Web Title: mns congress ncp kalyan akp 94
Next Stories
1 ठाण्यात गॅस पाइप लाइन फुटली; हजारो घरांचा गॅस पुरवठा बंद
2 कलानी कुटुंब पुन्हा राष्ट्रवादी काँग्रेसकडे
3 भाजपचे नाराज नेते तीन-चार महिन्यांपासून संपर्कात
Just Now!
X