विधानसभा निवडणुकीनंतर बुधवारी राष्ट्रवादीची महत्वपूर्ण बैठक मुंबईमध्ये पार पडणार आहे. मात्र या बैठकीआधी माहीम मतदारसंघामधून मनसेच्या तिकीटावर निवडणूक लढवलेले मनसेचे नेते आणि पक्षाचे सरचिटणीस संदीप देशपांडे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली. पवारांच्या कार्यपद्धतीने आपण प्रभावित झालो असून आपल्याला त्यांची भेट घेण्याची इच्छा असल्याचं देशपांडे यांनी सांगितल्यानंतर ही खास भेट घडून आल्याचे समजते.

संदीप देशपांडे यांनी बुधवारी सकाळी मुंबईतील पवार यांच्या निवासस्थानी म्हणजेच ‘सिल्व्हर ओक’ येथे जाऊन त्यांची भेट घेतली. जवळजवळ अर्धा तास झालेल्या या भेटीमध्ये दोघांनी राजकीय विषयांवर चर्चा केली. विधानसभा निवडणुकीमध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कामगिरीबद्दलची माहिती देशपांडे यांनी पवारांना दिली. पुढील आठवडाभरामध्ये पवार मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याशी चर्चा करणार असल्याचे समजते.

आणखी वाचा- “…तर राष्ट्रवादी राज्यात पर्यायी सरकार स्थापन करण्याचा विचार करेल”

देशपांडे हे यंदाच्या विधानसभा निवडणुकीमध्ये मनसेच्या तिकीटावर माहिममधून निवडणूक लढले होते. मात्र या निवडणुकीमध्ये त्यांचा पराभव झाला. शिवसेनेचे विद्यमान आमदार सदा सरवणकर यांनी १८ हजारहून अधिक मतांनी देशपांडेंचा पराभव केला. देशपांडे यांना ४२ हजार ६९० मते मिळाली. दुसऱ्या स्थानावर राहिलेल्या देशपांडे यांनी आपल्याला काँग्रेसने दिलेल्या उमेदवारामुळे फटका बसल्याचे म्हटले होते. माहिममधील काँग्रेसचे उमेदवार प्रविण नाईक हे मतदारसंघामधून तिसऱ्या क्रमांकावर राहिले. महिममध्ये मनसेचा पराभव का झाला याबद्दलही पवारांबरोबर देशपांडे यांनी चर्चा केल्याचे समजते. नाशिक आणि महीममध्ये मनसेचा विजय होईल अशी अपेक्षा पक्षाला होती असंही देशपांडेंनी पवारांना सांगितले.

विधानसभा निडणुकींसंदर्भात झालेल्या चर्चेमध्ये पवारांनी जनतेला भाजपाविरोधात मतदान करायचे असल्याचे मत व्यक्त केलं. “भाजपाविरोधात जनतेला मतदान करायचं असलं तरी विरोधी पक्षांची आघाडी अद्यापही विस्कळीत असल्याने अपेक्षित लक्ष्य गाठण्यात अपयश आले,” अशी खंत पवारांनी देशपांडेसमोर बोलून दाखवली. तसेच “पुढील काळात सर्व विरोधी पक्षांना एकजूट दाखवावी लागेल,” असंही पवार देशपांडे यांना म्हणाले.