विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यभरात आता उमेदवारांच्या प्रचाराची धामधूम पाहण्यास मिळत आहे. त्या पार्श्वभूमीवर आज मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या सभेचा शुभारंभ पुण्यातून होणार आहे. परंतु या सभेवर पावसाचं सावट आहे. तर सायंकाळी 6 नंतर जोरदार पावसाची शक्यता असल्याचा अंदाज पुणे वेध शाळेकडून व्यक्त करण्यात आला आहे.

आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय पक्षांकडून प्रचार सभा आणि रॅली काढल्या जात आहेत. याच दरम्यान मनसेची पहिली सभा आज पुण्यात होत आहे. मात्र, काल पुण्यात रात्री नऊनंतर जोरदार पाऊस झाला होता. यामुळे शुक्रवार पेठेतील नातू बागेतील मैदानावर राज ठाकरे यांच्या सभास्थळी पाणीच पाणी पाहण्यास मिळत आहे. आज होणार्‍या सभेला येणार्‍या नागरिकांना कोणताही त्रास होऊ नये यासाठी मैदानावरील पाणी काढण्याचे काम सुरू आहे. तर, सहा वाजेपर्यंत मैदान तयार होईल, असा विश्वासही कार्यकर्त्यांनी व्यक्त केला आहे.

पुणे शहर आणि परिसरात आज सायंकाळी 6 नंतर जोरदार पावसाची शक्यता आहे. तसेच उद्यादेखील शहरात अशाच स्वरूपाचा पाऊस पडणार असल्याची माहिती पुणे वेध शाळेचे अधिकारी अनुपम कश्यपी यांनी दिली.