मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पाच ऑक्टोबरला आपण प्रचारसभेची सुरुवात करणार असल्याचं जाहीर केल्यानंतर पक्षातील कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचं वातावरण आहे. काही दिवसांपर्यंत विधानसभा निवडणूक लढणार की नाही याबाबत संभ्रम असताना राज ठाकरे यांनी निवडणूक लढण्याचं जाहीर करत उमेदवार यादी जाहीर केली असल्याने पक्षातील कार्यकर्त्यांनी तयारी सुरु केली आहे. मात्र मनसेतील नाराज नेत्यांमुळे राज ठाकरेंची चिंता वाढण्याची शक्यता आहे. राज ठाकरेंचे निकटवर्तीय म्हणून ओळखले जाणारे अनिल मटाले यांनी पक्षाला सोडचिठ्ठी दिली आहे.

राज ठाकरे यांनी नाशिकमधून दिलीप दातीर यांना उमेदवारी जाहीर केली असल्याने नाराज झालेल्या अनिल मटाले यांनी राजीनामा दिला आहे. अनिल मटाले नाशिक पश्चिममधून निवडणूक लढण्यास उत्सुक होते. पण शिवसेनेतून प्रवेश केलेल्या दिलीप दातीर यांना उमेदवारी देण्यात आल्याने नाराज अनिल मटाले यांनी नाशिक मनसे शहराध्यक्ष पदाचा राजीनामा देत पक्षाला रामराम ठोकला आहे.

राजीनामा देताना अनिल मटाले यांनी पत्रात लिहिलं आहे की, ‘मी गेल्या २३ वर्षांपासून आपल्यासोबत काम करत आलो आहे. या २३ वर्षांमध्ये विद्यार्थी संघटनेचा जिल्हाध्यक्ष, नगसेवक, गटनेता मनसे मनपा ते नाशिक शहराध्यक्ष पदापर्यंत आपल्यासोबत काम करण्याची संधी मिळाली. या २३ वर्षात आपल्याकडून खूप काही शिकायला मिळाले. सदस्यात्वाचा आणि शहराध्यक्ष पदाचा राजीनामा देत आहे’.

सोमवारी राज ठाकरेंच्या उपस्थितीत धर्मा पाटील यांचे पुत्र नरेंद्र पाटील यांनी मनसेत प्रवेश केला. राज ठाकरे यांनी नरेंद्र पाटील पक्षातर्फे निवडणूक लढतील अशी घोषणा केली. शेतकरी धर्मा पाटील यांनी मंत्रालयात विष प्राशन करत आत्महत्या केली होती. नरेंद्र पाटील यांच्यासोबत शिवसेनेचे नाशिकचे नगरसेवक दिलीप दातीर यांनीदेखील मनसेत प्रवेश केला. तेदेखील मनसेतर्फे निवडणूक लढणार असल्याचं राज ठाकरे यांच्याकडून जाहीर करण्यात आलं आहे.