मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी विधानसभा निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला असल्याची सुत्रांची माहिती आहे. मनसेची बैठक आज पार पडली असून या बैठकीत राज ठाकरे यांनी निवडणूक लढवू असं जाहीर करत तयारीला लागण्याचा आदेश दिला आहे. मनसे ठाणे, मुंबई, नाशिक आणि पुण्यातून निवडणूक लढणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार, मनसे विधानसभेच्या १०० जागा लढवणार आहे. राज ठाकरे यांनी उमेदवारांची यादी मागवली आहे.

तसंच राज ठाकरे यांनी यावेळी स्वबळावर विधानसभा निवडणूक लढण्याचं जाहीर केल्याचीही माहिती आहे. आघाडीसोबत जाण्याची अद्याप तरी मसनेकडून कोणतीही तयारी करण्यात आलेली नाही. काही दिवसांपुर्वी विधानसभा निवडणूक लढवाची की नाही यामध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेमध्ये दुमत आहे अशी माहिती समोर आली होती. राज ठाकरे यांच्या कृष्णकुंज या निवासस्थानी ही बैठक पार पडली होती. या बैठकीत विधानसभा निवडणूक लढवायची की नाही यावर चर्चा झाली होती. या बैठकीनंतर बोलताना बाळा नांदगावकर यांनी योग्य वेळी राज ठाकरे निर्णय जाहीर करतील असं म्हटलं होतं.

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी बैठकीत निवडणूक लढवायची की नाही याबाबत नेत्यांची मतं जाणून घेतली होती. काही नेत्यांनी निवडणुकीला सामोरं जाण्याची तयारी दर्शवली होती. तर काहींनी मात्र थांबण्यास सांगितलं होतं.

लोकसभा निवडणूक न लढवता मनसेने मोदी विरोधी प्रचार केला होता. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मोदी आणि अमित शाह यांना हटवा असं आवाहन करत १० सभा घेतल्या होत्या. “लाव रे तो व्हिडीओ” हे सांगणाऱ्या त्यांच्या सभाही खास गाजल्या होत्या. मात्र प्रत्यक्षात या सभांचा काहीही परिणाम झाला नाही हे लोकसभा निवडणूक निकालानंतर स्पष्ट झाले. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी लोकसभा निवडणूक निकालाबाबत ‘अनाकलनीय’ अशी एका शब्दाची प्रतिक्रियाही दिली होती.