मधु कांबळे

मॉब लिंचिंग हा भारतीय शब्द नाही तर तो विदेशी आहे, या सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांच्या मताशी आपण सहमत आहोत, परंतु भारतात मॉब लिंचिंग होऊन त्यात सुडाचे राजकारण घडते. त्यात दलित व मुस्लिमांवर अत्याचार होत आहेत, अशी परखड भूमिका केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री व रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्ष रामदास आठवले यांनी मांडली.

विधानसभा निवडणुकीतील रिपब्लिकन पक्षाची भूमिका जाणून घेण्यासाठी आठवले यांच्याशी संवाद साधल्यानंतर त्यांनी सध्याच्या राजकीय, सामाजिक प्रश्नांवरील आपली मते मांडली. रिपब्लिकन राजकारणाचा प्रभाव ओसरत चालल्याचे त्यांनी मान्य केले. भाजप-शिवसेनेकडून रिपब्लिकन पक्षाला जागा कमी मिळाल्या तरी, सत्तेतील वाटा जास्त मिळणार आहे, असा दावा त्यांनी केला.

* भाजप-शिवसेनेबरोबर रिपब्लिकन पक्षाने युती केली आहे, मात्र आपल्या पक्षाने स्वतंत्र कार्यक्रम तयार केला आहे का किंवा कोणत्या मुद्दय़ांवर महायुतीतमध्ये सहभागी झाला आहात?

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्याशी चर्चा झाली आहे. त्यांच्यासमोर आम्ही आमचा कार्यक्रम मांडला आहे. शेतकऱ्यांचे कर्ज माफ केले आहे. त्याप्रमाणे मागासवर्गीय महामंडळांचे कर्ज माफ करावे, अशी आमची मागणी आहे. राज्यातील भूमिहिनांना, दलितांना प्रत्येक गावात पाच एकर जमीन द्यावी. झोपडपट्टी पुनर्वसन योजनेंतर्गत २०१४ पर्यंतच्या झोपडपट्टय़ा अधिकृत कराव्यात म्हणजे त्यांचेही पुनर्वसन करणे शक्य होईल. या योजनेत ४०० चे ४५० चौरस फुटांचे घर मिळाले पाहिजे. शासकीय सेवेत पदोन्नतीतील आरक्षणाबाबत सर्वोच्च न्यायालयाने मार्गदर्शक सूचना दिल्या आहेत. त्यानुसार राज्य सरकारने निर्णय घ्यायचा आहे. निवडणुकीच्या नंतर हा निर्णय घ्यावा, अशी मागणी आपण मुख्यमंत्र्यांकडे केली आहे व ती त्यांनी मान्य केली आहे. विशेष भरती मोहीम राबवून शासकीय सेवेतील मागासवर्गीयांचा अनुशेष भरून काढावा, असा आग्रही पक्षाचा राहणार आहे.

* प्रश्न-महायुतीत रिपब्लिकन पक्षाचे स्थान नेमके कुठे, नक्की किती जागा मिळाल्या?

रिपब्लिकन पक्षाला फक्त पाच जागा मिळाल्या आहेत. त्याबाबत आम्ही अजिबात समाधानी नाही. परंतु सत्तेतील सहभाग या वेळी जास्त मिळणार आहे. केंद्रात  कॅबिनेट मंत्रिपद मिळण्यासाठी मुख्यमंत्री प्रयत्न करणार आहेत. राज्यात एक कॅबिनेट, एक राज्यमंत्रिपद, विधान परिषदेच्या दोन आमदारकी देण्याचे मुख्यमंत्र्यांनी मान्य केले आहे. चार महामंडळांची अध्यक्षपदे रिपब्लिकन पक्षाला मिळणार आहेत. आमच्या पाचही जागा निवडून येतील. कमळ चिन्ह घेतले असले तरी, रिपब्लिकन पक्षाचा स्वतंत्र गट म्हणून मान्यता देऊ  असे मुख्यमंत्र्यांनी आश्वासन दिले आहे. काही लोक रिपब्लिकन पक्षाचे अस्तित्व संपवण्याचा प्रयत्न करीत आहेत. परंतु मी मात्र निळा झेंडा कायम फडकवत ठेवण्याचा प्रयत्न करणार आहे. बाबासाहेबांच्या संविधानाला आम्ही हात लावणार नाही, संविधानाप्रमाणे मी देश चालवतो आहे, अशी भूमिका पंतप्रधान नरेंद्र मोदी मांडतात. दलितांच्या आरक्षणाला आमचा अजिबात विरोध नाही, असे त्यांनी स्पष्ट केले आहे. नरेंद्र मोदींच्या सोबत रिपब्लिकन पक्षाने राहणे हे बाबासाहेबांचे स्वप्न साकार करण्यासाठी आवश्यक आहे.

* रिपब्लिकन पक्ष हा प्रबळ विरोधी पक्ष असावा, ही बाबासाहेब आंबेडकरांची मूळ संकल्पना होती, राज ठाकरे ती भूमिका आता मांडताहेत, आपले मत काय?

रिपब्लिकन पक्ष हा प्रबळ विरोधी पक्ष म्हणून उभा राहात असेल तर तसा प्रयत्न करायला हरकत नाही. मात्र सध्याच्या परिस्थिीतीत ते शक्य वाटत नाही. काही वर्षांपूर्वी रिपब्लिकन पक्षाचा प्रभाव होता, तो आता कमी झाला आहे, हे मान्य. परंतु  माझ्या गटाचा शिवसेना-भाजपवर प्रभाव आहे. आपल्या मतांवर ते निवडून येतात, हे नाकारून चालणार नाही.

* सरसंघचालक डॉ. मोहन भागवत म्हणाले की, मॉब लिंचिंग हा परकीय शब्द आहे, त्यावर आपली भूमिका काय आहे?

सरसंघचालक भागवत यांचे म्हणणे बरोबर आहे की मॉब लिचिंग हा भारतीय शब्द नाही तो इंग्लिश शब्द आहे. मी त्यांच्या या वक्तव्याशी सहमत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी अमेरिकेत केलेल्या भाषणात म्हणाले, भारताने जगाला युद्ध नव्हे तर बुद्ध दिला आहे. शांतता हा आंबेडकरवादाचा मुख्य गाभा आहे. प्रत्येकाच्या मनात, समाजात शांतता असली पाहिजे. मॉब लिचिंग होते, ही वस्तुस्थिती आहे आणि ते थाबंवणे अत्यंत आवश्यक आहे.

गेल्या २०१४ च्या निवडणुकीत भाजप-शिवसेना वेगळे लढले तरी त्यांना एकत्रित १८५ जागा मिळाल्या. या वेळी महायुतीच्या २४० पर्यंत जागा निवडून येतील. काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस आघाडी ४०-५० जागांपर्यंतच थांबेल, असा माझा अंदाज आहे.