राहुल गांधी यांचा आरोप; वर्धा जिल्ह्य़ातील आर्वी येथे प्रचारसभा

वर्धा : देशातील मोठमोठय़ा कंपन्या उद्योगपतींच्या हातात सोपवणारे मोदी सरकार हे केवळ उद्योगपतींचे सरकार आहे, असा आरोप काँग्रेस नेते खासदार राहुल गांधी यांनी केला.

वर्धा जिल्ह्य़ातील आर्वी येथे पक्षाचे उमेदवार अमर काळे यांच्या प्रचारार्थ आज मंगळवारी आयोजित सभेत ते बोलत होते. यावेळी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात, विजय वडेट्टीवार, चारुलता टोकस उपस्थिती होत्या. राहुल गांधी म्हणाले, जोपर्यंत गरिबांच्या हातात पैसा जात नाही तोपर्यंत देशाचा विकास शक्य नाही. परंतु देशात पेट्रोलियम, कोळसा खाणी व आता भारतीय रेल्वे उद्योगपतींच्या घशात घालण्याचा कार्यक्रम सुरू  आहे. त्यामुळे भारताची अर्थव्यवस्था कमकुवत होत आहे. बेरोजगारी वाढत आहे. काँग्रेसच्या शासनकाळात गरिबांना लाभ देणाऱ्या योजना सुरू झाल्या होत्या. मात्र भाजप सरकारने त्या बंद केल्या. मनरेगा ही योजना ग्रामीण भागातील लोकांना काम देणारी मोठी योजना होती. पण, त्याची या सरकारने टिंगल उडवली. नोटाबंदी करताना काळा पैसा बाहेर येणार असल्याचा दावा करण्यात आला. मात्र नोटाबंदीचा नेमका काय फायदा झाला, हे आजपर्यंत सांगितलेच नाही. त्यानंतर जीएसटी नावाचा गब्बरसिंग टॅक्स लावला. मात्र त्यामुळे छोटे व्यापारी, दुकानदार, किरकोळ विक्रेते यांचा व्यवसाय ठप्प पडला. अंबानी?अदानी यांना मात्र फायदा मिळाला.

आम्ही शेतकऱ्यांचे कर्ज माफ  करीत होतो. या सरकारने एक लाख ७५ हजार कोटी रुपयांचा बडय़ा उद्योगपतींचा कर माफ  करून टाकला. टीव्हीवाले या गोष्टी दाखवत नाहीत. अर्थव्यवस्थेची घसरती अवस्था सांगत नाहीत, अशी खंतही त्यांनी व्यक्त केली. यावेळी उमेदवार अमर काळे व शेखर शेंडे यांचीही भाषणे झाली. ही सभा पाऊण तास उशिरा सुरू झाली.

मोदींसह उद्योगपतींनी प्रसार माध्यमे विकत घेतली

यवतमाळ : पंतप्रधान नरेंद्र मोदींसह देशातील उद्योगपतींनी सर्व प्रसार माध्यमे विकत घेतली आहेत. त्यामुळे ही माध्यमे कायम सरकारचे गुणगाण करण्यात व्यस्त आहेत, असा आरोप राहूल गांधी

मंगळवारी वणी येथे काँग्रेस उमेदवारांच्या प्रचारार्थ आयोजित सभेत केला. यावेळी मंचावर काँग्रेस प्रभारी मल्लिकार्जून खारगे, प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात, विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार, यांच्यासह उमेदवार उपस्थित होते. राहुल गांधी म्हणाले, मोदी हे जनतेचे लक्ष विचलित करून देशाचा पैसा निवडक उद्योगपतींकडे वळवित आहेत.

नोटाबंदी, जीएसटीमुळे देशाची अर्थव्यवस्था आणि उद्योग, रोजगार बुडाले आहेत. हे चित्र बदलण्यासाठी महाराष्ट्रात पुन्हा एकदा गोरगरीब, सामन्य जनतेचे आघाडी सरकार निवडून द्या, असे आवाहन गांधी यांनी केले.